मुंबई - दरवर्षी पावसाळ्यात रस्त्यांवर खड्डे पडतात. यंदाही पाऊस सुरू झाल्यावर रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. रस्त्यावर खड्डे पडल्याचा मुद्दा बुधवारी पालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत गाजला. सर्वपक्षीय नगरसेवकांनी रस्त्यावर खड्डे पडल्याचे सांगत खड्डे बुजवण्यासाठी वापरण्यात येणारे कोल्डमिक्स तंत्रज्ञान फेल ठरले असताना त्याचा वापर का केला जात आहे? असा प्रश्न उपस्थित केला. यावर मुंबई खड्डे मुक्त कधी होणार? असा प्रश्न विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी उपस्थित केला.
मागील वर्षी पावसाळ्यात शहरातील रस्त्यावर खड्डे पडले होते. कोल्डमिक्स हे तंत्रज्ञान वापरून खड्डे बुजवले तरी पुन्हा खड्डे होत असल्याने कोल्डमिक्स तंत्रज्ञान फेल असल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. कोल्डमिक्स ऐवजी दुसरे तंत्रज्ञान वापरून खड्डे भरावेत, अशी मागणी नगरसेवकांकडून करण्यात आली होती. गेल्या काही दिवसांपासून शहरात पाऊस पडत आहे. पावसाची सुरुवात होताच पुन्हा रस्त्यावर खड्डे पडल्याने नगरसेवकांनी नाराजी व्यक्त करत प्रशासनाला धारेवर धरले. खड्ड्यांमुळे नागरिकांचा जीव जाण्याची शक्यता असल्याने पालिका प्रशासनाने कोल्डमिक्स ऐवजी हॉटमिक्स तंत्रज्ञान वापरून खड्डे बुजवावेत, अशी मागणी राखी जाधव, रईस शेख आदी नगरसेवकांनी केली.
मुंबई खड्डेमुक्त करा, नंतरच नवीन रस्त्यांचे प्रस्ताव स्थायी समितीत मंजुरीसाठी आणा, अशी मागणी रवी राजा यांनी यावेळी केली. वर्षभरापूर्वी वरळी येथील पालिकेच्या कोल्डमिक्स प्लांटची पाहणी केली असता, तो प्लांट बंद होता. २७ रुपयांचे कोल्डमिक्स वापरुन जीवाचे मोल नसणाऱ्या मुंबईकरांच्या जीवाशी खेळ खेळला जातो. त्यामुळे कोल्डमिक्स ऐवजी हाॅटमिक्सचा वापर करा, अशी मागणी सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी केली. कोल्डमिक्समुळे खड्डे चांगल्याप्रकारे बुजवले जात नाहीत, अशी तक्रार नगरसेवक आणि नागरिकांची आहे. यामुळे खड्डे बुजवण्यासाठी नवे तंत्रज्ञान आणावे तोपर्यंत हॉटमिक्सने खड्डे बुजवावेत, असे निर्देश स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी प्रशासनाला दिले.
अधिकाऱ्यांना गोव्यात पाठवा -
गोव्यातही मुसळधार पाऊस पडतो. परंतु, तिकडचे रस्ते खड्डेमुक्त असतात. गोव्याचे बजेट मुंबई पालिकेच्या बजेटच्या तुलनेत कमी असताना त्या ठिकाणी रस्ते चांगल्या प्रतीचे आहेत. त्याठिकाणच्या रस्त्यावर खड्डे पडत नाहीत. परंतु, श्रीमंत महापालिका क्षेत्रात हे शक्य का होत नाही. पालिकेच्या रस्ते विभागातील अभियंता व अधिकाऱ्यांना गोव्यातील रस्त्यांचा अभ्यास करण्यासाठी पाठवावे, अशी सूचना स्थायी समिती सदस्य अभिजीत सामंत यांनी केली. धोकादायक इमारत, धोकादायक झाड असलेल्या ठिकाणी फलक लावण्यात येतात. त्याच प्रमाणे खड्ड्याजवळही धोकादायक असे फलक लावावे, म्हणजे नागरिक जीवाची काळजी घेत खड्ड्याजवळून जाणे टाळतील असे सामंत म्हणाले.
रस्त्यावरील ८० टक्के खड्डे भरल्याचा दावा -
एकीकडे रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाबाबत संताप व्यक्त केला जात असताना दुसरीकडे मुंबईतील ८० टक्के खड्डे भरण्यात आल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. रस्त्यांवरील खड्डयांबाबत ७०३ तक्रारी पालिकेकडे आल्या. त्यातील ५५२ खड्डे भरण्यात आल्याचे अतिरिक्त आयुक्त प्रवीण दराडे यांनी यावेळी स्पष्ट केले. कोल्डमिक्सचा वापर हा पावसात होतो, तर हाॅटमिक्सचा वापर कधीही केला जाऊ शकतो, असेही दराडे म्हणाले.