मुंबई - आज (दि. 29 ऑक्टोबर) मुंबईत कोरोनाच्या नव्या 1 हजार 120 रुग्णांची नोंद झाली असून 33 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या एकोणीस दिवसात रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 69 वरून 149 दिवस इतका वाढल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
आज मृत्यू झालेल्या 33 रुग्णांपैकी 26 रुग्णांना दिर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 21 पुरुष तर 12 महिला रुग्ण आहेत. मुंबईमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 लाख 55 हजार 362 वर पोहोचला आहे. तर, मृतांचा आकडा 10 हजार 186 वर पोहोचला आहे. मुंबईमधून आज 1 हजार 824 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. मुंबईत डिस्चार्ज देण्यात आलेल्यांचा आकडा 2 लाख 26 हजार 241 वर गेला आहे. सध्या मुंबईत 18 हजार 367 सक्रिय रुग्ण आहेत.
मुंबईत कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 88 टक्क्यांवर पोहोचले आहे. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 149 दिवस तर सरासरी दर 0.46 टक्के आहे. मुंबईत सध्या कोरोनाचे रुग्ण आढळून आलेल्या 606 चाळी आणि झोपडपट्टी प्रतिबंधित क्षेत्र (कंटेन्मेंट झोन) घोषित करून सील करण्यात आल्या आहेत. तसेच 7 हजार 250 इमारती व इमारतीच्या विंग, काही मजले सील करण्यात आले आहेत. तर, कोरोनाचे निदान करण्यासाठी 14 लाख 98 हजार 598 इतक्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.
हेीह वाचा - माजी सैनिकांना दिलासा; घरपट्टी मालमत्ता कर माफीसाठी बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने माजी सैनिक सन्मान योजना