मुंबई - कोरोना काळाचा सर्वात जास्त फटका मुंबईसह महाराष्ट्राला बसला असून, कोरोनामुळे आरोग्यक्षेत्रातील त्रुटी समोर आल्या आहेत. राज्याच्या अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्रासाठी खास तरतूद करावी, अशी मागणी राज्याचे आरोग्यमंत्री यांनी अर्थमंत्री अजित पावर यांच्याकडे मागणी केली आहे. राज्याचा अर्थसंकल्प काही दिवसात मांडण्यात येणार असून अर्थमंत्री सर्व खात्यांच्या बैठका घेऊन अर्थसंकल्पात संबंधित खात्यांसाठी काय तरतूद करण्यात यावी, याचा आढावा घेत आहेत.
हेही वाचा - मुंबई महापालिका अर्थसंकल्प : आयुक्त पहिल्यांदाच स्थायी समितीच्या बैठकीला
गेले 11 महिने कोरोनाचे सावट देशासह राज्यावर आहे. अजूनही कोरोनाचा धोका पूर्ण संपलेला नाही. त्यामुळे भविष्यात अशा आरोग्यविषयक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आपल्याला तयार राहावे लागणार असल्याची कल्पना सर्वांनाच आलेली आहे. आरोग्य क्षेत्रात आमूलाग्र बदल करण्याची गरज आहे. त्यामुळे आरोग्यखात्यासाठी राज्यसरकारकडून अधिकचा निधी मिळावा, अशी आशा आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी व्यक्त केली आहे. येणाऱ्या अर्थसंकल्पात त्यासाठी खास तरतूद करण्यात यावी, यासाठी आरोग्यमंत्र्यांनी अर्थमंत्र्यांकडे मागणी केली. त्यामुळे राज्याच्या अर्थसंकल्पात आरोग्यविभागाला भरघोस निधी मिळेल, अशी आशा आहे.
केंद्राच्या अर्थसंकल्पात लसीकणारासाठी 35 हजार कोटी
नुकत्याच केंद्रसरकारने सादर केलेल्या बजेटमध्ये आरोग्य क्षेत्रासाठी खास निधी उपलब्ध करून दिला आहे. लसीकरणाची 35 हजार कोटींचा निधी देण्यात आला असून गरज असल्याच या निधीत वाढ केली जाईल, असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून सांगण्यात आले आहे. त्या निधीचाही उपयोग होईल, अशी आशा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा - लोकल ट्रेनची वेळ वाढवा: आरोग्यमंत्र्यांची मुख्य सचिवांसोबत चर्चा