मुंबई - बुधवारी (१ मे) महाराष्ट्र दिनाच्या दिवशी नक्षलवाद्यांनी गडचिरोली येथे हल्ला केला. या घटनेनंतर गौतम नवलखा यांना अटकेपासून दिलेला दिलासा रद्द करावा, अशी मागणी मुंबई उच्च न्यायालयात गुरुवारी राज्य सरकारने केली आहे. आजच्या सुनावणीत गौतम नवलाख यांचे नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचा दावा पुन्हा एकदा राज्य सरकारने केला आहे.
मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रणजित मोरे व न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर ही याचिका सुनावणीस आली. त्यानंतर न्यायमूर्तींनी तत्काळ यावर सुनावणी घेण्यास नकार देत गौतम नवलखा यांना अटकेपासून दिलेला दिलासा १२ जूनपर्यंत कायम ठेवला आहे.
नक्षलवाद्यांशी संबंध व कोरेगाव-भीमा हिंसा प्रकरणी गौतम नवलखा यांच्याविरोधात पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केली होती. त्यानंतर अटकेपासून दिलासा मिळविण्यासाठी गौतम नवलखा यांनी मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी याचिका दाखल केली. मात्र, मागच्या सुनावणीत मुंबई उच्च न्यायालयाने गौतम नवलखा यांना १२ जूनपर्यंत अटक न करण्याचे आदेश दिले होते.