मुंबई - कोरोनाचा प्रादुर्भाव कमी व्हावा यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला, संचारबंदीही लागू झाली. गल्लो-गल्लीतील दवाखाने बंद झाले. साध्या तापाच्या रुग्णांचे हाल होऊ लागले. हे हाल होऊ नयेत, म्हणून 62 वर्षीय डॉक्टर अरुण मोहिते आपल्या वयाचा विचार न करता दररोज पनवेलमधील कामोठे ते वडाळा प्रवास करत वैद्यकीय सेवा देत आहेत.
लॉकडाऊन काळात डॉक्टरांनी देखील आपले क्लिनिक बंद केले होते. यावरून मोठा वाद देखील झाला. मात्र, काही डॉक्टर असे आहेत जे आपल्या वयाचा आणि जिवाचा विचार न करता रुग्णसेवा देताना दिसत आहेत, यात डॉ.अरुण मोहिते यांचा उल्लेख करावा लागेल. पनवेल कामोठे येथे राहणारे डॉक्टर अरुण मोहिते यांचे वडाळा कोरबा मिठागर येथे क्लिनिक आहे. लॉकडाऊनमध्ये ते बसने दादरला येतात त्यानंतर दुसरी बस पकडून ते त्यांच्या क्लिनिकवर पोहोचतात असा त्यांचा सध्याच्या परिस्थितीतला दैनंदिन प्रवास आहे.
कोरोना विषाणूचा संसर्ग आपल्याला होऊ नये, यासाठी सर्वजण घाबरले आहेत. मात्र, घाबरून कसे चालेल अतिआवश्यक सेवा आहेत. त्या दिल्याच पाहिजेत. जेव्हा राज्यात संचारबंदी लागू झाली तेव्हा काही काळ माझे क्लिनिक बंद होते. कारण तसे आमच्या ऑर्गनायझेशनने सांगितले होते. मात्र, त्या काळातही मी माझ्या रुग्णाच्या संपर्कात होतो. त्यांना त्यांच्या आजारावरती काय केले पाहिजे हे सांगत होतो. नंतर क्लिनिक सुरू झाले. दररोज दोन तास प्रवास करून मी संध्याकाळी साडेपाच ते साडेसात-आठ दरम्यान क्लिनिक सुरू ठेवतो. येणाऱ्या रुग्णाला मास्क घालून येणे अनिवार्य आहे.
अनेक पेशंट येतात ते ताप खोकला याच आजाराची असतात. यामुळे त्यांना भीती असते की, त्यांना कोरोना झाला नाही ना? अशा रुग्णांची भीती घालवण्यासाठी डॉक्टरचा हवा आहे, हा विचार करून मी दररोज क्लिनिकला येतो व पुढेही येत राहणार. आता माझी जबाबदारी अधिक वाढलीय. माझ्या घरातून मला पूर्ण पाठिंबा आहे, फक्त येवढेच सांगतात की, तुम्ही तुमची काळजी घ्या, असे डॉक्टर मोहिते यांनी सांगितले.