मुंबई - कोरोनाचा विषाणू म्युटेंट होत आहे, म्हणजेच ती बदलत आहे. कोरोनाचा नवीन व्हेरियंट ''डेल्टा प्लस" समोर आला आहे. जे अधिक भयानक आहे. त्यातच, प्रसार माध्यमांमध्ये राज्यात कोरोनाच्या डेल्टा प्लस या व्हेरियंटचे 7 रुग्ण सापडले असल्याच्या बातम्या प्रसारित होत आहेत. त्यातले 5 रुग्ण रत्नागिरीचे असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, डेल्टा प्लस या व्हेरियंटचा एकही रुग्ण राज्यात सापडला नसल्याचे राज्याचे वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाणे यांनी सांगितले आहे.
कोरोनाचे 'डेल्टा प्लस' व्हेरियंट आहे तरी कसे?
जगभरातील 10 देशांमध्ये हा डेल्टा प्लस व्हेरियंट आढळून आला आहे. भारतात कोरोना विषाणू आढळून आला. मात्र, कालांतरानं हा विषाणू म्युटेंट झाला. म्हणजे त्या विषाणूने स्वत:मध्ये बदल करुन घेतेला. बदलेलेला विषाणू डेल्टा व्हेरियंट (B.1.617.2) या नावाने ओळखला जावू लागला. आता या डेल्टा विषाणूने पुन्हा स्वत:मध्ये बदल केल्याचे दिसून येतंय. या बदललेल्या विषाणूला डेल्टा प्लस किंवा AY.1 असं नाव देण्यात आलंय.
नवा व्हेरियंट अँटीबॉडी कॉक्टेलला चकवा देण्यास यशस्वी
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा नवा व्हेरियंट अँटीबॉडी कॉक्टेलला चकवा देण्यास यशस्वी होत आहे. मात्र, दिलासादायक वृत्त म्हणजे राज्यात कोरोनाचा डेल्टा प्लस व्हेरियंट आढळून आलेला नाही. त्यामुळे लोकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन डॉ. लहाणेंनी केले आहे.
हेही वाचा - मुंबईत आज 733 नव्या कोरोना रुग्णांची नोंद; 19 रुग्णांचा मृत्यू