मुंबई - कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता बाजारात हॅण्ड सॅनिटायझरची मागणी वाढली आहे. अशातच साठेबाजांनी हॅण्ड सॅनिटायझरची साठेबाजी करून चढ्या भावाने विकण्यास सुरुवात केली आहे. यामुळे मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट 6ने या विरोधात कारवाई करत 2 लाख 50 हजार रुपयांच्या 5 हजार बाटल्या जप्त केल्या आहे. या प्रकरणी तिघांना जणांना अटक केली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बाजारात मास्क व हॅण्ड सॅनिटायझरचा तुटवडा भासत असल्यामुळे केंद्र सरकारकडून 13 मार्च रोजी मास्क व हॅण्ड सॅनिटायझर या अत्यावशक वस्तू असल्याची अधिसूचना जारी करण्यात आली होती. त्यानंतर मास्क व हॅण्ड सॅनिटायझर हे ठरलेल्या भावात विकण्याची अधिसूचनाही जारी करण्यात आली. मात्र, मुंबईतील माहीम परिसरात दिनाथवाडी येथील एका फ्लॅटमध्ये हॅण्ड सॅनिटायझरचा मोठ्या प्रमाणात साठा करून ठेवण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
त्यानुसार या ठिकाणी गुन्हे शाखेच्या युनिट 6 ने छापा टाकत हिंदुस्तान लॅबोरेटरी कंपनीच्या हॅकिंटो जेल हॅण्ड सॅनिटायजरचा साठा जप्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी 3 जणांना अटक केली आहे, हे तिन्ही आरोपी 50 रुपये किंमत असलेने हॅण्ड सॅनिटायझर 65 रुपयांना विकत असल्याचेही पोलीस तपासात समोर आले आहे.
हेही वाचा - COVID-19 : ...म्हणून 'जनता कर्फ्यू' दिवशी केवळ 5 भाेंगे वाजले