मुंबई - मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर मराठा समाजाला दिलासा देण्यासाठी मराठा समाजातील एसईबीसी प्रवर्गात असणाऱ्या उमेदवारांना आता ईडब्ल्यूएस प्रवर्गातून अर्ज करता येणार आहे. यासंबंधीचा शासन निर्णय राज्य सरकारने प्रसिद्ध केला आहे. मात्र यासाठी मराठा समाजातील उमेदवारांना ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र असणे आवश्यक असणार आहे.
आरोग्य विभागातील भरतीमध्ये करता येणार अर्ज -
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात 13 हजार पदांची भरती आहे. या भरतीमध्ये मराठा समाजातील तरुणांना ईडब्ल्यूएस अंतर्गत उमेदवारी अर्ज भरता येणार आहे. यासाठीचा शासन आदेश राज्य सरकारकडून काढण्यात आला आहे. मराठा समाजाच्या आरक्षण मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असल्याकारणाने ही पदे भरण्यात आली नव्हती. मात्र आता सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर, मराठा समाजातील उमेदवारांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.

मराठा क्रांती मोर्चाची नाराजी -
ईडब्ल्यूएस पर्याय हा मराठा समाजातील तरुणांकडे आधीपासूनच उपलब्ध होता. त्यामुळे अशा प्रकारचे शासन आदेश काढून राज्य सरकार केवळ मराठा समाजाची दिशाभूल करत आहे. असा आरोप मराठा क्रांती मोर्चाचे मुंबई मधील समन्वयक वीरेंद्र पवार यांनी केला आहे. मराठा समाजाला सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येण्याआधी एसईबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळत असल्याकारणाने ईडब्ल्यूएस प्रवर्गात आरक्षण थांबवण्यात आलो होते. मात्र मराठा आरक्षण रद्द झाल्यामुळे ईडब्ल्यूएसचा पर्याय मराठा समाजाकडे आधीपासूनच उपलब्ध असल्याचे वीरेंद्र पवार यांनी सांगितले आहे.
