मुंबई - राजस्थानमधील काँग्रेसचे सरकार पाडण्यासाठी भाजपाकडून करण्यात येत असलेल्या षडयंत्राच्या विरोधात आज काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी राजभवनासमोर जोरदार निदर्शने केली.यावेळी भाजप आणि मोदी सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, मुंबई प्रदेश अध्यक्ष एकनाथ गायकवाड, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, माजी मंत्री नसीम खान यांच्यासोबत काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले होते.
भाजपकडून सत्ता आणि पैशाचा गैरवापर करून विविध राज्यातील विरोधी पक्षांचे सरकार पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे. आमचे राजस्थानमध्ये असलेले सरकारही पडून भाजप लोकशाहीची हत्या करू पहात असून त्याविरोधात आम्ही राजभवनासमोर हे आंदोलन करून भाजपाला ईशारा देत असल्याचे यावेळी बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. राजस्थानमध्ये आमचे मुख्यमंत्री विश्वास मत सादर करण्यासाठी परवानगी मागतात परंतु त्यांना ती परवानगी दिली जात नाही. भाजपाकडून मोठ्या प्रमाणात दबावाचे राजकारण केले जात आहे तसेच, राजभवन हे राजकारणाचे अड्डे बनलेले असल्याचा आरोप सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी यावेळी केला.
हेही वाचा - जनता कर्फ्यूनंतर नियमांचे उल्लंघन केल्यास होणार कारवाई - आयुक्त तुकाराम मुंढे