मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील कोरोना परिस्थिती हाताळण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. देशातील कोरोना परिस्थिती पंतप्रधानांना आटोक्यात आणता आलेली नाही. मात्र, त्याच जागी जर नितीन गडकरी हे असते तर त्यांनी ही परिस्थिती योग्यरीत्या हाताळली असती, अशी स्तुतिसुमने नाना पटोले यांनी नितीन गडकरी यांच्यावर उधळली आहेत. तसेच अशी चर्चा भाजपच्या एक गोटातही केली जात असल्याचेही नाना पटोले यांनी यावेळी सांगितले. तसेच नागपूरकरांनी नितीन गडकरी यांना भावी पंतप्रधान म्हणूनच मते दिली होती. त्यामुळे नितीन गडकरी जर पंतप्रधान झाले तर नागपूरकर त्यांचे स्वागत करतील, अशी भावनाही नाना पटोले यांनी व्यक्त केली.
खतांच्या वाढलेल्या किंमती विरोधात काँग्रेस राज्यभरात घंटानाद आंदोलन करणार आहे. तर तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी आज (दि. 19 मे) केली जाणार असल्याचेही नाना पटोले यांनी सांगितले. तसेच पंतप्रधान नुकसानाची पाहणी करण्यासाठी गुजरातमध्ये येत आहेत. मात्र, त्यांनी थोडा वेळ काढून महाराष्ट्राचीही पाहणी करावी, असा चिमटा नाना पटोले यांनी काढला.
केंद्र सरकारकडून खतांच्या किमती वाढवण्यात आलेले आहेत. खताच्या प्रत्येक पोत्यामागे जवळपास सातशे रुपयांची दरवाढ केंद्र सरकारने केली आहे. या दरवाढीच्या विरोधात महाराष्ट्र काँग्रेस तर्फे आंदोलन करण्यात येणार आहे. येत्या दोन ते तीन दिवसात राज्यभरात प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद करून खतांच्या वाढलेल्या किंमतीच्या विरोध काँग्रेसकडून केला जाणार असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडून देण्यात आली. सत्तेवर आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने शेतकऱ्याचे कंबरडे मोडण्याचा काम केले आहे. शेतकऱ्यालाही आता कळून चुकले की, मोदी सरकार हे शेतकऱ्यांचा सरकार नाही, असा टोलाही नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेतून केंद्र सरकारला लगावला आहे.
चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी
राज्य सरकारकडून चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी केली जाणार आहे. मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार आणि मत्स्य उद्योग मंत्री असलम शेख यांच्याकडून तौक्ते चक्रीवादळामुळे मुंबई तसेच कोकण किनारपट्टी आणि इतर जिल्ह्यात झालेल्या नुकसानाची पाहणी केली जाणार असल्याची माहिती नाना पटोले यांनी देण्यात आली आहे. तसेच लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील या सर्व भागाची पाहणी करणार असल्याच नाना पटोले यांनी सांगितले. सध्या मुख्यमंत्र्यांनी स्थानिक प्रशासनाला नुकसानाची पाहणी करण्याचे आणि त्वरित मदत करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, झालेल्या नुकसानाची पाहणी मुख्यमंत्र्यांकडून काही दिवसानंतर केली जाणार असल्याचेही नाना पटोले यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी त्वरित पाहणी केली तर, स्थानिक यंत्रणेवर त्याचा ताण येतो आणि स्थानिक प्रशासनाकडून नुकसान झालेल्या स्थळाची पाहणी करताना कोणी राहू नये याची दक्षता घेऊन मुख्यमंत्र्यांनी पाहणी दौरा सध्या करत नसल्याचे नाना पटोले यांच्याकडून माहिती देण्यात आली आहे.
थोडा वेळ काढून पंतप्रधानांनी महाराष्ट्राच्या नुकसानाची पाहणी करावी
तौक्ते चक्रीवादळाचा फटका गुजरातसह महाराष्ट्रालाही बसला आहे. मात्र, आज (दि. 19 मे) पंतप्रधानांकडून गुजरातमध्ये झालेल्या नुकसानीची पाहणी केली जाते पंतप्रधान म्हणून त्यांनी नुकसानाची पाहणी करणे योग्यच आहे. मात्र, गुजरात सोबत महाराष्ट्रातही तौक्ते चक्रीवादळामुळे नुकसान झाला आहे. त्यामुळे पंतप्रधानांनी थोडा वेळ काढून महाराष्ट्रातही नुकसानाची पाहणी करावी, असा चिमटा नाना पटोले यांच्याकडून काढण्यात आला.
हेही वाचा - लसीकरण न झाल्याने हजारो विद्यार्थी परदेशी शिक्षणापासून वंचीत