मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज यांची आज तिथीनुसार जयंती आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवरायांना अभिवादन केले. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरातील महाराजांच्या पुतळ्याला त्यांनी पुष्पहार अर्पण केला. यावेळी परिवहन मंत्री अनिल परब, खासदार अरविंद सावंत आदी उपस्थित होते.
शिवजयंती हा उत्सव तिथीनुसार या वर्षी ३१ मार्च २०२१ रोजी साजरा केला जात आहे. कोव्हिड-१९ मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता यावर्षी तिथीनुसार 'छत्रपती शिवाजी महाराज जयंती' उत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनीही महाराजांना अभिवादन केले आहे.
ह्या आहेत मार्गदर्शक सूचना
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती दिनाच्या पूर्वसंधेला अनेक शिवप्रेमी गडकिल्ल्यांवर एकत्र येऊन शिवजयंती साजरी करतात. परंतु यावर्षी कोव्हिड-१९ चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात एकत्र न येता साधेपणाने शिवजयंती साजरी करावी. दरवर्षी शिवजयंती साजरी करताना संपूर्ण महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. परंतु यावर्षी सार्वजनिक ठिकाणी पोवाडे, व्याख्यान, गाणे, नाटक इत्यादींचे सादरीकरण अथवा इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करु नये. त्याऐवजी अशा कार्यक्रमांचे केबल नेटवर्क अथवा ऑनलाईन प्रक्षेपण उपलब्ध करुन देण्याबाबत व्यवस्था करण्यात यावी. अशा सूचना शासनाकडून देण्यात आल्या आहेत.
हेही वाचा-लोकल, बस प्रवासावर येणार निर्बंध; राज्य सरकारची नवी नियमावली दोन दिवसांत