मुंबई - मेट्रोच्या कारशेडवरून राजकारण चांगलेच तापू लागले आहे. आघाडी सरकार सत्तेवर येण्याआधी उद्धव ठाकरे यांनी गोरेगाव आरे येथील कारशेड कांजूरमार्गला हलवू असे आश्वासन दिले होते. त्यानुसार कारशेड कांजूरला हलवल्यावर सॉईल टेस्टिंगचे काम सुरू झाले असताना केंद्र सरकारने त्या जागेवर दावा केला आहे. केंद्र सरकारने राज्य सरकारला कारशेडचे काम बंद करण्याची नोटीस बजावली आहे. यावरून मुख्यमंत्री बदलल्यावर जागेची मालकी बदलते का, असा थेट सवाल मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी उपस्थित केला आहे. तसेच मुंबई आणि महाराष्ट्राच्या हितासाठी सक्षम असलेले पंतप्रधान चांगला निर्णय घेतील, असा टोला महापौरांनी लगावला आहे.
भाजप पंतप्रधानांना टोला -
मेट्रोच्या कांजूरमार्ग येथील कारशेडचे काम बंद करण्याची नोटीस दिली आहे. याबाबत बोलताना महापौरांनी मुख्यमंत्री बदलल्यावर जागेची मालकी बदलते का, असा थेट सवाल उपस्थित केला आहे. याबाबत बोलताना केंद्र सरकारने आरे कारशेडच्या कामाला स्थगिती दिली असेल तर, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी कोर्टात ही जमीन राज्य सरकारची असल्याचे प्रतिज्ञापत्र सादर केले होते. फडणवीस यांनी दाखल केलेले प्रतिज्ञापत्र आजही कोर्टात असेल. जर तत्कालीन मुख्यमंत्री ही जागा राज्य सरकारची आहे असे म्हणत असतील तर मुख्यमंत्री बदलल्यावर या जागेची मालकी बदलली का. असा प्रश्न महापौरांनी उपस्थित केला आहे. केंद्र सरकारला कोणी काहीही फीड करत आहेत. या ठिकाणी कारशेड बांधले तर कल्याण डोंबिवली पर्यंतच्या नागरिकांना त्याचा फायदा होईल. कांजूरच्या जागेबाबत भाजपच्या मुख्यमंत्र्यांनीच प्रतिज्ञापत्र दिले असल्याने या जागेचा केंद्र सरकार नक्की विचार करेल. मुंबई आणि महाराष्ट्राच्या हितासाठी सक्षम असलेले पंतप्रधान चांगला निर्णय घेतील असा टोला महापौरांनी लगावला आहे.
कारशेडचा वाद -
33.5 किमीच्या मेट्रो 3 मार्गासाठी आरे जंगलातील 33 एकर जागेवर कारशेड बांधण्याचा निर्णय मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (एमएमआरसी) ने घेतला. त्यानुसार ही जागा मिळवली, त्यावर काम देखील सुरू केले. अगदी काही दिवसांपूर्वी या जागेवर कारशेडचे काम सुरू होते. मात्र यावरुन 2014 मध्ये संघर्षाला सुरुवात झाली. पर्यावरण प्रेमी आणि आदिवासीयांनी याला विरोध करत रस्त्यावरची आणि न्यायालयीन लढाई सुरू केली. ही लढाई सात वर्षे सुरू होती. अखेर त्यांच्या या लढ्याला महाविकास आघाडी सरकारच्या काळात यश आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरे कारशेड कांजूरला हलवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली.
कारशेडवरून राजकारण -
आरे कारशेडला पर्यावरण प्रेमींचा विरोध आणि शिवसेनेचा त्यांना पाठिंबा असला तरी भाजप मात्र आरेच्या जागेवर अडून आहे. त्यामुळेच 2014 पासून आरे कारशेडला विरोध होत असतानाही, कांजूरची जागा सुचवण्यात आली असतानाही तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरेतच काम सुरू केले होते. त्यामुळेच उद्धव ठाकरे यांनी कांजूरमध्ये कारशेड हलवल्यानंतर भाजप आणि शिवसेनेत मोठा संघर्ष निर्माण झाला. आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडू लागल्या. उद्धव ठाकरे यांनी अहंकारातून निर्णय घेतल्यापासून ते यामुळे 4000 कोटींचे नुकसान होईल असे आरोप फडणवीस यांनी केले. हे सर्व आरोप शिवसेनेने फेटाळून लावले.
कारशेडला ग्रहण -
कांजूरला कारशेड हलवल्यानंतर मेट्रो 3 च्या कारशेडचा वाद संपेल असे वाटत होते. पण यावरून राजकारण सुरू झाले. आता तर थेट केंद्र आणि राज्य सरकार असा संघर्ष पेटणार असून या प्रकल्पाला पुन्हा ग्रहण लागून प्रकल्प रखडण्याची शक्यता आहे. कारण कांजूरच्या जागेवर आता केंद्र सरकारने दावा केला आहे. ही जागा आपल्या मालकीची असल्याचे म्हणत केंद्राच्या उद्योग संवर्धन आणि अंतर्गत व्यापार (डीआयपीपी) मंत्रालयाने राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र पाठवले आहे. या पत्रात काम थांबवण्यासही सांगितल्याचे म्हटले जात आहे. पण संजय कुमार यांनी मात्र याबाबत अधिक बोलण्यास नकार दिला. पत्राला आम्ही योग्य ते उत्तर देऊ असे त्यांनी स्पष्ट केले आहे. यावरून केंद्र विरुद्ध राज्य असा संघर्ष पेटण्याची शक्यता व्यक्त होत आहे. तर या राजकारणाचा फटका एका महत्वाकांक्षी प्रकल्पाला बसणार असल्याचे म्हटले जात आहे.