मुंबई - कोरोना विरोधातील लढ्यात मुंबई आणि उपनगरात अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांची ने-आण करण्यासाठी बेस्ट उपक्रमाकडून विशेष बसच्या फेऱ्या चालवण्यात येत आहेत. संकटाच्या काळात जीवाची आणि कुटुंबाची पर्वा न करता बेस्ट कर्मचारी आपली सेवा देत आहेत. मात्र, बेस्ट प्रशासनाकडून त्यांच्यासाठी पुरेशी सुरक्षा सामुग्री पुरवली जात नाही. कोरोनाची लागण झालेल्या कर्मचाऱ्यांची देखभाल देखील प्रशासन करत नसल्याने येत्या सोमवारपासून बेस्ट कर्मचारी घरातच बसून संप करणार आहेत. १०० विविध मागण्यांसाठी कर्मचारी लॉकडाऊन पाळणार आहेत, अशी माहिती बेस्ट कामगार संघटनेचे सरचिटणीस जगनारायण कहार यांनी दिली.
कोरोनाची बाधा होणे आणि मृत्यूमुखी पडणाऱ्या बेस्ट कर्मचार्यांची संख्या वाढत आहे. याकडे महाराष्ट्र शासन, महानगरपालिका आणि बेस्ट प्रशासनाकडून सर्रास दुर्लक्ष होत आहे. बेस्ट उपक्रमाच्या अनास्थेमुळे कोरोनाबाधित बेस्ट कर्मचार्यांची संख्या दिवसेंदिवस वाढून ती आता शंभरच्या घरात पोहोचली आहे. याकडे लक्ष देण्याचे सोडून काही कारणामुळे कर्मचारी कार्यालयात उपस्थित राहू शकला नाही तर त्याला पगार कपात करण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत.
सध्या 600 पेक्षा जास्त बेस्ट कर्मचारी क्वारंटाईन आहेत. सुमारे ६० टक्के कर्मचारी मुंबई शहर आणि उपनगरांच्या हद्दीबाहेर राहतात. त्यांना कामावर पोहचण्यासाठी गाड्या उपलब्ध केलेल्या नाहीत. याबाबत मुख्यमंत्री, महापौर, पालिका आयुक्त तसेच बेस्टचे महाव्यवस्थापकांच्या ही परिस्थिती लक्षात आणून दिली. मात्र, आत्तापर्यंत याकडे लक्ष दिले गेले नाही. त्यामुळे आता बेस्ट कामगार 100 टक्के लॉकडाऊन पाळून प्रशासनाचे याकडे लक्ष वेधणार आहेत.
आत्तापर्यंत कोरोनामुळे 6 बेस्ट कर्मचाऱ्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांना सुरक्षेसाठी पुरेशा वस्तू पुरवण्यात बेस्ट प्रशासन असमर्थ ठरत आहे. तक्रार करूनही प्रशासनाने दखल घेतली नाही. त्यामुळे येत्या सोमावरपासून १०० टक्के लॉकडाऊन पाळून बेस्ट प्रशासनाला धडा शिकवायचा आहे, असे बेस्ट संयुक्त कामगार समितीचे शशांक राव यांनी सांगितले.