मुंबई - अंमली पदार्थांच्या आहारी जाऊन तरुणपीढी बरबाद होत आहे. या अंमली पदार्थ विकणाऱ्यांना फाशीची शिक्षाच दिली पाहीजे, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केले.
कामात व्यस्त असणाऱया आई-वडिलांना ११-१२ वी मधील मुले काय करतात, याची कल्पना नसते. मुंबई, ठाण्यासारख्या शहरांप्रमाणेच इतर शहरांतही अंमली पदार्थ सेवन करण्याचे प्रमाण वाढले आहे. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी अंमली पदार्थ विकणाऱ्यांना फाशीची शिक्षाच दिली पाहिजे असे अजित पवार म्हणाले.
ठाणे शहरात काही ठिकाणी अवैध धंद्यामध्ये गुंड प्रवृत्तीच्या लोकांमध्ये वाढ झाली असून, त्याचा त्रास सामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे. या व्यक्तींमुळे शालेय विद्यार्थी तसेच तरुण पिढी ही अंमली पदार्थांच्या आहारी गेली असल्याची धक्कादायक बाबही उघडकीस आली आहे. शाळकरी मुले मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थाचे सेवन करत असल्यामुळे त्यांचे कुटुंबीयही हताश झाले आहेत. अशा तरुणांना वेळीच परावृत्त करणे गरजेचे आहे. अन्यथा अशा मुलांचे भविष्य अंधारात आहे.