मुंबई - लोकमान्य टिळक टर्मिनस येथे शालिमार एक्सप्रेसमध्ये ठेवण्यात आलेल्या जिलेटीन सदृश्य कांड्यांसंदर्भातील प्रकरणात कुठलेही दहशतवादी संबंध नसल्याचे समोर आले आहे. केवळ प्रेयसीच्या नवऱ्याला धडा शिकवण्यासाठी एका व्यक्तीने हे कृत्य केले. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी आनंद वानखेडे (वय २८) या तरुणाला अटक केली आहे.
आरोपी वानखेडेचे एका मुलीवर प्रेम होते. मात्र, या मुलीने दुसऱ्या व्यक्तीशी लग्न केले. त्यामुळे प्रेयसीच्या पतीला धडा शिकवण्यासाठी शालिमार एक्सप्रेसमध्ये जिलेटीन सदृश्य कांड्यांसोबत मुंबईतील विक्रोळी परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीचा फोटो, मोबाईल क्रमांक आणि धमकी देणारी चिठ्ठी ठेवली होती. या साहित्यावरून पोलिसांनी संबंधित व्यक्तीची चौकशी केली. गेल्या काही दिवसांपासून त्या व्यक्तीला फेसबुक आणि मोबाईलवरही कोणीतरी विनाकारण त्रास देत असल्याचे संबंधित व्यक्तीने सांगितले. त्यावरून पोलिसांनी चौकशी केली असता आनंद वानखेडे याला बुलडाण्यातील नांदुरा येथून अटक करण्यात आल्याचे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
बनावट फेसबुक अकाऊंट उघडून प्रेयसीच्या पतीला देत होता त्रास -
आनंद वानखेडे हा बनावट फेसबुक अकाऊंट बनवून प्रेयसीच्या पतीला गेल्या काही महिन्यांपासून त्रास देत होता. मात्र, त्याचे समाधान न झाल्याने गेल्या ५ जूनला त्याने शालिमार एक्सप्रेसमध्ये पीडित व्यक्तीचा फोटो, मोबाईल क्रमांक आणि धमकी देणारी चिठ्ठी ठेवली होती.