मुंबई : पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोट निवडणुकीत भाजपच्या समाधान अवताडे यांनी महाविकास आघाडीच्या भगीरथ भालके यांचा पराभव केला. महाविकास आघाडी एकत्र असताना तसेच हा मतदार संघ राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जात असतानाही भाजपने विजय संपादन केला. यामुळे भाजपचे मनोबल वाढले आहे. आगामी निवडणुकांत भाजपला रोखण्यासाठी सर्व राजकीय पक्षांना आता मतदार संघ बांधणीवर भर द्यावा लागणार आहे, असे मत राजकीय विश्लेषक संदीप प्रधान यांनी व्यक्त केले.
पंढरपूर विजय मनोबल वाढवणारा
अगोदर बिहार, त्यानंतर पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रात सत्ता बदल होईल, अशा पद्धतीची वक्तव्य राज्यातील भाजप नेत्यांनी केली होती, किंबहुना आताही ते करत आहेत. पश्चिम बंगालमध्ये भाजपचे संख्याबळ वाढले असले तरी अपेक्षित यश मिळवता आलेले नाही. मात्र, पंढरपूर- मंगळवेढा मतदार संघात झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपला यश मिळाले. पश्चिम बंगालमध्ये भाजपचा नैतिक पराभव झाला. मात्र, पंढरपूर पोट निवडणुकीत विजय मिळाल्याने भाजप नेत्यांना मानसिक बळ मिळाले आहे. आमचा विजय हा महाविकास आघाडीच्या विरोधातील कौल असल्याची भाषा आता भाजपकडून सुरू झाली आहे. त्यामुळे ते आता आणखी आक्रमक होतील, यात दुमत नाही. कोरोनाची हाताळणी, लसीकरण आदी मुद्यांवर राज्यातील सरकार केंद्रावर टीका करत आहे. त्याला प्रतिउत्तर देताना, भाजपच्या नेत्यांची धार अधिक वाढणार असल्याचे दिसतेय. त्यामुळे पंढरपूरचा विजय हा बुडत्याला काठीचा आधार अशा पध्दतीने भाजपचे मनोबल वाढवणारा असेल, असे विश्लेषण संदीप प्रधान यांनी केले.
ऑपरेशन लोटस अपयशी?
कर्नाटकात भाजपने ऑपरेशन लोटस राबवून कॉंग्रेस-जेडीसएसकडून सत्ता हिसकावून घेतली होती. मध्य प्रदेशातही कमलनाथ यांचे सरकार पाडण्यासाठी ज्योतिरादित्य शिंदे यांना गळाला लावले. सर्व साम-दाम-दंड भेदाचा धाक दाखविण्यात आले. पश्चिम बंगालमध्येही ३० हून अधिक आमदार भाजपने फोडले. मात्र, तरीही ममता बॅनर्जी यांनी एकहाती सत्ता मिळवली. हा विजय एकतर्फी असला तरी भाजपकडून जागा वाढल्याचा दावा केला जातो आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी, पंढरपूर पोट निवडणुकीच्या प्रचारात ही जागा निवडून द्या, मी सरकार पाडून दाखवतो, असे विधान केले आहे. तर एकमागोमाग एक राज्य त्यांच्या हातातून निसटत असल्याने नेते व कार्यकर्त्यांचा उत्साह टिकवण्यासाठी त्यांना अशा बातम्या पेराव्या लागत आहेत, असे महाविकास आघाडीतील नेत्यांचे म्हणणे आहे.