लातूर - गावलगत असलेल्या विहिरीतील गाळ काढून संबंध गावाला पाणीपुरवठा व्हावा या उद्देशाने विहिरीत उतरलेल्या तिघांचा गुदमरून मृत्यू झाला तर अन्य तिघे जण गंभीर आहेत. मृतांमध्ये एकाच कुटूंबातील तिघांचा समावेश आहे. ही घटना औसा तालुक्यातील अलमला गावात घडली आहे.
सध्या अलमला गावात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे गावालगत असलेल्या विहिरीतील गाळ काढून पाणी साठवण क्षमता वाढावी, या उद्देशाने आज सकाळी फारुख खुदबद्दीन मुलानी त्यांचा मुलगा सद्दाम फारुख मुलानी, पुतण्या सय्यद दाऊद मुलानी, सुशांत बिराजदार, योगेश हुरदुळे व शहीद मुलानी हे विहिरीत गाळ काढण्यासाठी उतरले होते. मात्र, अरुंद व खोल असलेल्या विहिरीत या ६ जणांचा ऑक्सिजन अभावी जीव गुदमरल्याने ते सर्वजण अत्यावस्थेत झाले.
तेव्हा गावकऱ्यांनी त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान फारुक मुलानी त्यांचा मुलगा सद्दाम मुलानी व पुतण्या सय्यद दाऊद मुलानी यांचा मृत्यू झाला आहे. तर सुशांत बिराजदार, योगेश हुरदुळे व शहीद मुलानी यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेने अलमला गावावर शोककळा पसरली असून घटनेनंतर जिल्हा प्रशासन गावात दाखल झाले आहे. यावर पुढील कारवाई सुरू आहे.