निलंगा - राज्य आणि केंद्र सरकारने एकत्र येऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे. तरच शेतकरी उभा राहील, असं छत्रपती संभाजी राजे यांनी म्हटले आहे. ते निलंगा येथे बोलत होते. परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. तालुक्यातील संपूर्ण नुकसानग्रस्त भागांची पाहणी करून, आपण राज्य शासनाकडे मदतीचा प्रस्ताव पाठवणार असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले.
दरम्यान निलंगा दौऱ्यावर आल्यानंतर छत्रपती संभाजी राजे व आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी शिवाजी चौकातील छञपती शिवाजी महाराज यांच्या चरणी पुष्पहार अर्पण केला. यावेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एकरी 50 हजार ते 1 लाख रुपयांपर्यंत नुकसानभरपाई मिळावी यासह विविध मागण्यांचे निवेदन मराठा सेवा संघाच्या वतीने संभाजी राजे यांना देण्यात आले. आज छत्रपती संभाजी राजे हे लातूर दौऱ्यावर आहेत. त्यांनी निलंगा तालुक्यातल्या अतिवृष्टी झालेल्या गावांना भेट देऊन नुकसानाची पहाणी केली. यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या व्याथा त्यांच्यासमोर मांडल्या.