लातूर - हुंडा प्रथेसारख्या अनिष्ठ रुढी परंपरांना मुठमाती देण्यासाठी, निराधार विवाहित महिलांचा हुंड्यासाठी होणारा छळ रोखण्यासाठी 1 जूलै 1961मध्ये कायदा अंमलात आला. मात्र, हुंडाबंदी कायद्याच्या 60 वर्षानंतरही आज राज्यासह देशातील परिस्थिती बदललेली नाही. लातूर जिल्ह्यात हुंड्यामुळे आजही काय परिस्थिती आहे, याबाबत ईटीव्ही भारतने विशेष आढावा घेतला.
लातूर जिल्ह्यातील आकडेवारी काय सांगते?
मागील अडीच वर्षाच्या कालावधीत लातूर जिल्ह्यातील एकूण 23 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे चित्र आकडेवारीहून स्पष्ट झाले आहे. जानेवारी-डिसेंबर, 2019 या वर्षात 618 महिलांचा हुंड्यासाठी छळ झाला आहे. यातील सहा महिलांचा बळी गेला आहे. जानेवारी-डिसेंबर, 2020 या वर्षात महिला अत्याचाराच्या 536 घटना घडल्या असून यातील सात महिलांच्या हुंड्यासाठी बळी गेला आहे. तर सध्या चालू वर्षात जानेवारी-जुलै, 2021पर्यंत महिला अत्याचाराच्या 350 घटना घडल्या असून एका महिलेचा हुंडाबळी गेला आहे.
कोरोना संसर्गामध्येही महिलांच्या अत्याचाराच्या घटना जिल्ह्यात घडल्या आहेत. लॉकडाऊननंतर लातूरच्या महिला तक्रार निवारण केंद्राकडे (भरोसा सेल) तब्बल 538 तक्रारी दाखल झाल्या आहेत. नोंद झालेल्या तक्रारीनंतर विविध प्रकरणात भरोसा सेलकडून सुनावणी आणि समुपदेशन करण्यात आले आहे. यातून घटस्फोटाच्या उंबरठ्यावर असलेल्या अनेक जोडप्यांचे संसार पुन्हा जुळले असल्याचेही स्पष्ट झाले आहे. जानेवारी-डिसेंबर 2019 या वर्षात तब्बल 618 प्रकरणांची लातूरच्या महिला तक्रार निवारण केंद्राकडून सुनावणी केली आहे. यातील 169 प्रकरणात जोडप्यांची तडजोड झाली असून 323 जोडप्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. तर 58 प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती 'भरोसा सेल'च्या सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपाली गिते यांनी दिली.
हेही वाचा - Eta variant : डेल्टा, डेल्टा प्लसनंतर आता इटा व्हेरिएंट, कर्नाटकात सापडला रुग्ण
सामाजिक कार्यकर्त्या काय म्हणाल्या?
हुंडाबंदी कायद्याच्या साठीनंतरही मुलीच्या सासरच्या मंडळींची हुंड्याबाबतची मानसिकता बदललेली नाही. हुंडा द्यावा लागतो म्हणून मुलीचा जन्म नको, अशा विचाराने मुलीला गर्भातच मारले जाते. शिवाय कित्येक शेतकऱ्यांनी मुलीला हुंडा द्यावा लागतो. म्हणून आत्महत्या केल्या आहेत. प्रतिष्ठेसाठी, मनाच्या समाधानासाठी, सरकारी नोकरीच्या कारणाने हुंडा दिला व घेतला जातो. मात्र, तिला वारसा हक्क सन्मानाने मिळावा. जेणेकरुन तो अडचणीत काळात आधार होईल व मुलगीही सन्मानाने जगण्यासाठी लायक आहे, हे सुशिक्षित समाजात रुजेल तेव्हा हुंड्यासारख्या अनिष्ठ प्रथेला मुठमाती देण्यात आपण यशस्वी होऊ, असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या प्रा. चंद्रकला भार्गव यांनी 'ई-टीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केले आहे.
लातूरच्या पोलीस अधीक्षक कार्यालयात असलेल्या महिला तक्रार निवारण केंद्राच्या माध्यामातून पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण चव्हाण, पोलीस नाईक गोविंद दरेकर, उत्तम जाधव, महिला पोलीस नाईक कविता जाधव, मिरा साळुंखे, लता गीरी, प्रतिभा हिंगे हे पोलीस अधिकारी, कर्मचारी माहेरची परिस्थिती बिकट, आई-वडील मोलमजुरी करणारे अशा परिस्थितीत हुंड्यासाठी सासरकडून विवाहितेचा होणारा छळ अशा द्विधा मनस्थितीत असलेल्या व वेळप्रसंगी मृत्यूला जवळ करणाऱ्या महिलांसाठी न्यायाच्या भुमिकेतून कर्तव्य बजावत आहेत. काही प्रकरणात महिला धाडस करत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करत आहेत. यातून त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराची व्यापकता व गांभीर्य समोर येत आहे.