लातूर - मराठवाड्यामधील दुष्काळ दूर करण्यासाठी नदी जोड प्रकल्पाची गरज असून त्यांची अंमलबजावणी तत्काळ होण्याची गरज असल्याचे मत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले. आठवले २ दिवसांपासून लातूर जिल्ह्याच्या दुष्काळ दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज औसा तालुक्यातील जयनगर येथील शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. नदीजोड प्रकल्पाशिवाय कोणताच पर्याय शिल्लक नसल्याने शासनाने नदी जोड प्रकल्प करणे गरजेचे असल्याचे आठवले यांनी सांगितलं.
नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. तिथे जनावरांना तर दिवसातून एक वेळेसच पाणी देण्याची नामुष्की ओढवली आहे. सध्या मराठवाड्यातील शेतकरी एक ना अनेक समस्यांना सामोरे जात आहे. यातच निवडणुका आणि राज्यात लागू असलेली आचारसंहिता यामुळे उपाययोजनेकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे आता पाहणी न करता थेट मदतीची गरज असल्याचेही आठवले यांनी सांगितलं.
केंद्र सरकारने दुष्काळी मदत केली असून राज्य शासनही लवकरच योग्य ते पाऊल उचलतील. मात्र, दुष्काळ कायमचा मिटवायचा असेल तर नदीजोड प्रकल्प हाच एकमेव पर्याय आहे. त्यामुळे मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील धरणे, प्रकल्प भरण्यास मदत होईल. कागदावर असलेली ही योजना प्रत्यक्षात येणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने शेतकऱ्यांचे सर्व प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मांडून मार्गी लावणार असल्याचेही आठवले यांनी सांगितलं.
या प्रसंगी शेतकऱ्यांनी पाणीप्रश्न, चारा छावणीची मागणी करत आता पाहणीची नाहीतर प्रत्यक्ष मदतीची अपेक्षा व्यक्त केली. यावेळी परिसरातील गावातील शेतकरी एकत्र जमले होते. शेतकऱ्यांच्या समस्या ऐकून त्वरित मार्गी लावण्याचे आश्वासन केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दिले आहे.