लातूर - कृषी उत्पन्न बाजार समितीमधील माथाडी कामगारांच्या न्याय प्रश्नांची सोडवणूक करण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे विविध मागण्यांसाठी लातूर येथील उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीमधील माथाडी कामगारांनी संप पुकारला होता. त्यामुळे बुधवारी दिवसभर व्यवहार ठप्प राहिले, तर बाजार समितीमध्ये कमालीचा शुकशुकाट पाहावयास मिळाला.
माथाडी सल्लागार समिती व माथाडी मंडळाची पुर्नरचना करणे, नोकरीत कामगारांच्या मुलांना प्राधान्य देणे, मंडळावर संचालक, सचिव यांची कायमस्वरूपी निवड करणे, राज्यभरातील कामगारांचे प्रश्न सोडवणे, यासारख्या मागण्या प्रलंबित आहेत. त्यामुळे सरकारचा निषेध करत आज माथाडी कामगारांनी बंद पाळला होता.
हेही वाचा - माथाडी कामगारांचा बंद अयशस्वी; बाजार छुप्यारितीने सुरूच
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत दिवसाकाठी कोट्यवधींची उलाढाल होते. दहा हजार कर्मच्याऱ्यांचे हात राबत असतात. कामगारांच्या संपामुळे समितीत दाखल होणाऱ्या शेतकऱ्यांची काही प्रमाणात गैरसोय झाली. माथाडी कर्मचाऱ्यांनी यापूर्वीही मागण्यासाठी आंदोलन केले होते. मात्र, आता मागण्या मान्य न झाल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे. बंद दरम्यान कामगारांनी बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर सरकार विरोधी घोषणाबाजी केली.