लातूर - औसा तालुक्यातील कोरंगळा शिवारात मंगळवारी रात्री अचानक जनावरांच्या पाच गोठ्यांना आग लागल्याने पाच जनावरे जखमी झाले आहेत. आगीचे नेमके कारण अस्पष्ट असून शेतकऱ्यांचे जवळपास तीन लाखाचे नुकसान झाले आहे.
कोरंगळा शिवारात मंगळवारी रात्री अचानक एकसलग असलेल्या जनावरांच्या गोठ्यांना आग लागली होती. यामध्ये राजेंद्र शिंदे, मधुकर शिंदे, शुक्राचार्य शिंदे, मारुती शिंदे, मगरध्वज शिंदे यांच्या गोठ्यातील जीवनावश्यक साहित्य जळून खाक झाले. गोठ्यातील पाच जनावरे जखमी झाली आहेत. तीन शेतकरी कुटुंबासमवेत शेतामध्येच वास्तव्यास होते. आगीचे नेमके कारण समजलेले नाही. या आगीत ३ लाखापेक्षा अधिकचे नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीधर शिंदे यांनी जखमी झालेल्या जनावरांवर उपचार केले. दरम्यान, आ. बसवराज पाटील यांनी घटनास्थळी जाऊन शेतकऱ्यांची भेट घेतली आहे. तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी पंचनामा केला असून शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे.