लातूर - प्रवासभत्ता फरक देयकाची तपासणी करून केवळ एका स्वाक्षरीसाठी २५ हजारांची मागणी करणाऱ्या कनिष्ठ लेखाधिकाऱ्याच्या हातात बेड्या पडल्या आहेत. शिरूर अनंतपाळ येथील पंचायत समिती येथे कार्यरत असलेल्या आलोसे मुक्तार जानेमिय मनियार यांच्यावर लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली.
शिरूर अनंतपाळ तालुक्यातील साकोळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याचे ५ लाख ४ हजार ३३६ रुपयांच्या प्रवासभत्याचे फरक देण्याचे काम कनिष्ठ लेखाधिकारी मनियार यांच्याकडे होते. या रकमेच्या १० टक्क्यानुसार लाचेची मागणी त्यांनी तक्रारदाराकडे केली होती. यासंबंधी प्राथमिक आरोग्य विभागातील कर्मचाऱ्याने लाचलुचपत विभागाकडे तक्रार नोंद केली. त्यानुसार सोमवारी पंचायत समिती परिसरात २० हजारांची लाच घेताना मनियार यांना रंगेहाथ पकडण्यात आले. या प्रकरणी शिरूर अनंतपाळ पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक बाबासाहेब काकडे हे करीत आहेत.
हेही वाचा - बहुमताच्या दिवशीच लातुरातील राष्ट्रवादीच्या आमदारांचे कळेल 'मत'
हा सापळा पोलीस अधिक्षक कल्पना बारवकर, अप्पर पोलीस अधिक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो. उपाधिक्षक माणिक बेंद्रे, पो. नि. कुमार दराडे, संजय पस्तापुरे, लक्ष्मीकांत देशमुख यांनी रचला होता.
हेही वाचा - नुतन महापौरांचा अभिनव उपक्रम; जलसंवर्धनासाठी केली जनजागृती