कोल्हापूर - महाविकास आघाडीसरकारने यापूर्वीच अनिल देखमुख यांच्या प्रकरणावरून भूमिका मांडली आहे. केंद्र सरकारने राज्याच्या तपास यंत्रणेवर किती हस्तक्षेप करावा, याला मर्यादा आहेत. जर वारंवार केंद्र सरकार राज्याच्या तपासयंत्रणेत हस्तक्षेप करत असेल, तर राज्याच्या स्वायत्तेला मर्यादा येतील, असे मत गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केले. ते कोल्हापूर दौऱ्यावर आले असता बोलत होते.
पुढे देसाई म्हणाले, पश्चिम महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री दख्खनच्या राजा जोतीबाच्या यात्रेचा आजचा (दि. 26 एप्रिल) प्रमुख दिवस आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. त्याचा आढावा आज घेतला. भाविकांनी पोलीस प्रशासनाला 100 टक्के प्रतिसाद आजची यात्रा संपन्न केली असल्याचे सांगितले.
महाराष्ट्र -कर्नाटक सीमेवर पाहणी
गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई हे आज पुणे-बंगलोर महामार्गावरील महाराष्ट्र-कर्नाटक सीमा असलेल्या कोगनोळी टोल नाका येथे जाऊन पाहणी करणार आहेत. तसेच तेथील परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांचा आढावा घेऊन त्या संदर्भात निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा - मुख्य यात्रेदिवशी जोतिबाची शाही थाटात बैठी अलंकारिक पूजा