कोल्हापूर - आगामी ग्रामपंचायत निवडणुकीचे वारे आता सर्वत्र फिरू लागले आहे. मात्र गावामध्ये गट तट निर्माण होऊन कटुता निर्माण होऊ नये म्हणून आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी मोठी घोषणा केली आहे. आपल्या मतदारसंघातील कोणत्याही ग्रामपंचायतीने येणारी निवडणूक बिनविरोध केली तर त्या ग्रामपंचायतीला 50 लाखांचा निधी देणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. त्यांच्या या घोषणेमुळे आता काही ग्रामपंचायतींनी निवडणूक बिनविरोध करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. मात्र, प्रत्यक्षात किती गावातील पुढाऱ्यांना आपल्या गावात विकास व्हावा असे वाटत हे पाहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर शिरोळ विधानसभा मतदारसंघातील ग्रामपंचायतसाठी घोषणा - येत्या 15 जानेवारी रोजी ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. यामध्ये शिरोळ विधानसभा मतदारसंघात एकूण 32 ग्रामपंचायतींच्या निवडणुका लागल्या आहेत. या सर्वच 32 ग्रामपंचायतींची आरोग्यराज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी मोठी घोषणा केली आहे. एव्हड्या मोठा निधी मिळवून गावाचा विकास करा, असे आवाहन सुद्धा यड्रावकर यांनी केले आहे.
गट तट बाजूला ठेवा - ग्रामपंचायत वगळता सर्वच निवडणुका या पक्षीय पातळीवर होत असतात. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीनंतर गावामध्ये गट तट निर्माण होऊन एकमेकांमध्ये कटुता निर्माण होत असते. हे टाळण्यासाठी ग्रामपंचायत बिनविरोध करणे अतिशय योग्य पर्याय आहे. यामुळे गावाचा विकास साधण्यास चांगली मदत होते. त्यामुळेच अशा बिनविरोध निवडणूक करणाऱ्या ग्रामपंचायतींना आपण स्वतः 50 लाखांचा निधी देणार असल्याची घोषणा यड्रावकर यांनी केली आहे. त्यामुळे आता किती गावातल्या पुढाऱ्यांना आपल्या गावाचं भलं व्हावं असं वाटतं हे पाहावे लागणार आहे.
राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंकेंनी केली २५ लाखाची घोषणा-
पारनेर मतदार संघाचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी देखील यापूर्वीच ग्रामपंचाय निवडणूक बिनविरोध केल्यास त्या ग्रामपंचायतीला २५ लाखांचा आमदार निधी देण्याची घोषणा केली आहे. यासाठी त्यांनी गटनिहाय ग्रामपंचायतीच्या भेटीगाठीही घ्यायाला सुरुवात केली आहे.