कोल्हापूर : गोकुळ दूध संघाचे मावळते चेअरमन विश्वास नारायण पाटील यांनी 14 मे रोजी राजीनामा दिल्यानंतर ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे यांची आज चेअरमनपदी निवड करण्यात आली. चेअरमन पदासाठी डोंगळे यांना दोन वर्षांचा कालावधी देण्यात आला आहे. दरम्यान गोकुळमध्ये महाडिक गटाची 30 वर्षाहून अधिकचा काळ सत्ता होती. माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ आणि सतीश पाटील यांनी गोकूळमध्ये सत्तांतर घडवून आणले होते. सत्ता हस्तगत केल्यानंतर चेअरमनपदी विश्वास पाटील आणि आता अरुण डोंगळे यांना संधी देण्यात आली आहे.
सत्ताधाऱ्यांनी शब्द पाळला : गोकुळ दूध संघावर माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या गटाची सत्ता होती. यावेळी सुद्धा विश्वास नारायण पाटील यांना दोनवेळा अध्यक्षपदाची धुरा सांभाळण्याची संधी मिळाली. तर अरुण डोंगळे यांनाही एकदा अध्यक्ष होण्याची संधी मिळाली. मात्र हे दोघेही गोकुळच्या सत्तांतरामध्ये महत्वाचे शिलेदार असल्याने सतेज पाटील गटाकडून त्यांनाच अध्यक्ष पदाचे दावेदार मानले गेले होते. त्यानुसार आमदार हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांनी ठरवल्याप्रमाणे जिल्ह्याचे सत्ताकेंद्र असणाऱ्या गोकुळवर अरुण डोंगळे यांना अध्यक्ष करून आपला शब्द पळाला आहे.
डोंगळे यांना मिळाला होता दोन वर्षांचा कार्यभार : गोकुळच्या चेअरमन पदावर विराजमान झालेले अरुण डोंगळे यांना यापूर्वी अध्यक्ष पदाचा दोन वर्षाचा कार्यभार मिळाला होता. 30 नोव्हेंबर 2010 ते 7 ऑक्टोबर 2013 या कालावधीत डोंगळे यांनी गोकुळचे नेतृत्व केले होते. आता पुन्हा 10 वर्षानंतर अध्यक्षपदाची माळ डोंगळे यांच्या गळ्यात पडली आहे, जिल्ह्याचे महत्त्वाचे सत्ता केंद्र असलेल्या गोकुळची नेतृत्व करताना अनुभव आणि नव्या संकल्पनांची सांगड घालून गोकुळला अधिक कार्यक्षम बनवण्यावर भर देणार असल्याचे डोंगळे यांनी यावेळी सांगितले. निवड झाल्यानंतर डोंगळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आपल्या कार्यभाराच्या दोन वर्षात आपण वितरण म्हणजे मार्केटिंगवर काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. दुधाच्या पाऊचचे विक्री प्रमाण वाढेल कसे यावरही काम केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा -
- Shiv Sena Want 22 Lok Sabha Seat : लोकसभेसाठी शिंदे गटाचा प्लान ठरलाय, 22 भाजपला आणि 22 जागांव शिंदे गट लढवणार निवडणूक
- Samruddhi Mahamarg Inauguration: आता फक्त 6 तासात नाशिककरांच्या दारी येणार नागपूरची संत्रा बर्फी, समृद्धीच्या दुसऱ्या टप्प्याचे आज उद्धाटन
- Sharad Pawar : लोकसभा निवडणुकीत शरद पवार ठरणार किंगमेकर?