कोल्हापूर - दूधगंगा नदीतून इचलकरंजी शहराला पाणीपुरवठा करण्यासाठीच्या प्रस्तावित योजनेला विरोध वाढू लागला आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्यात कोल्हापूर जिल्ह्यात पाण्यावरूनच संघर्ष पेटण्याची शक्यता आहे. कागल आणि करवीरसह चार तालुक्यातील शेतकऱ्यांनी एकत्र येत बिद्री इथे दूधगंगा नदीच्या पुलावर आज धरणे आंदोलन केले.
भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित सिंह घाटगे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात सर्वपक्षीय नेते सहभागी झाले होते. यावेळी कोणत्याही परिस्थितीत इचलकरंजी शहराला दूधगंगा नदीतून पाणी न देण्याचा निर्धार करण्यात आला. प्रसंगी आंदोलनाची तीव्रता वाढवू पण हक्काचे पाणी देणार नाही, असा पवित्रा या चारही तालुक्यातील शेतकर्यांनी घेतला आहे. या योजनेचा फेरविचार करण्यासाठी सरकारला विनंती केली. मात्र आता विनंती करणार नाही, तर महामार्ग रोको आंदोलन करू, असा इशारा भाजप जिल्हाध्यक्ष घाटगे यांनी यावेळी दिला.
काळम्मावाडी धरणासाठी आमच्या जमिनी गेल्या आहेत. आम्हाला अजून पाणी पुरत नाही. तरीही इचलकरंजीकर पंचगंगा प्रदुषित करून दूध गंगेतील पाणी मागत आहेत. ते आम्ही कदापिही देणार नाही. वारणावरून योजना का झाली नाही? याचे उत्तर आधी त्यांनी द्यावे, असेही अनेक शेतकऱ्यांनी यापूर्वी म्हटले आहे. ही योजना झाल्यास अनेक गावांच्या पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही, असा निर्धारही यावेळी शेतकऱ्यांनी केला आहे.