जालना- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग सज्ज असतानाच जिल्ह्यातील बदनापूर येथील ग्रामीण रुग्णालयात मात्र सर्वसामान्य रुग्णांना सेवा मिळण्यास प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे. या ग्रामीण रुग्णालयात बहुतांश पदे रिक्त आहेत. तसेच शहरापासून हे रुग्णालय अडीच ते तीन किलोमीटर अंतरावर असल्याने रुग्णांना येथे येण्यास अडचणी येत असतानाच सुविधांचीही वानवाच आहे. तसेच अपुऱ्या कर्मचारी बळावर रुग्णसेवा कोलमडण्याची परिस्थिती आहे.
हेही वाचा- खुशखबर.. १ एप्रिलपासून पुढच्या ५ वर्षांसाठी राज्यात वीज होणार स्वस्त
बदनापूर येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिक्षकांचे पद रिक्त आहे. त्यामुळे अतिरिक्त कार्यभार वैद्यकीय अधिकारी डॉ. ओम ढाकणे यांच्याकडे आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांचे तीन पदे असताना 1 पद रिक्त आहे. कनिष्ठ लिपिकाच्या दोन पदापैकी एक पद रिक्त आहे. शिपायाच्या 7 पदांपैकी 3 पदे रिक्त आहेत. सुरक्षा रक्षाकांच्या तीन पदांपैकी एक पद रिक्त आहे. अशा अपुऱ्या कर्मचाऱ्यांच्या बळावर हे रुग्णालय सुरू आहे.
त्यामुळे उपस्थित अधिकारी, कर्मचाऱ्यांवर याचा प्रचंड ताण येत आहे. त्यातल्या त्यात काही कर्मचारी मुख्यालयी राहात नसल्याचेही निदर्शनास येत आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सर्व आपत्कालीन सेवा देणाऱ्यांना मुख्यालयी राहण्याचे आदेश असतानाही हे कर्मचारी राहत नाहीत. त्यामुळे नागरिकांची मोठी हेळसांड होत आहे. त्यामुळे रुग्णांची मोठी अडचण होत असून हे रुग्णालय शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर असल्यामुळे येथे येण्यास वाहने मिळत नाहीत.
सध्या कोरोनामुळ सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. लॉकडाऊन परिस्थितीत ग्रामीण भागातून शहरात येण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. त्यानंतरही रुग्ण कसाबसा रुग्णालयात आला तर 10 वाजेपर्यंत रुग्णसेवा सुरुच होत नाही. वैद्यकीय अधिकारी बरोबर नऊ वाजता येऊन रुग्ण तपासणीसाठी सज्ज असतात. परंतु, नियमानुसार आधी चिठ्ठी काढणे आवश्यक असते. चिठ्ठी देणारा कर्मचारी मात्र 10 वाजेपर्यंत येत नाही. त्यामुळे वैद्यकीय अधिकारी उपलब्ध असूनही इलाज मात्र होत नाही.
कसे बसे रुग्ण तपासले तर त्यानंतर औषधी देणारा कर्मचारीही वेळेवर जागेवर सापडत नाही. काही वेळेस तर चक्क शिपाई किंवा सुरक्षारक्षकांना औषधी काढून द्यावे लागत असल्याचे प्रकार येथे दिसून आले आहेत. या ठिकाणी सद्य स्थितीत 6 पदे रिक्त असल्यामुळे रुग्णसेवा ढेपाळण्याच्या परिस्थितीत आहे. सद्यस्थितीत ग्रामीण रुग्णालयात कोरोनोच्या पार्श्वभूमीवर 5 खाटा आयसोलेशन केलेल्या आहेत. बाह्य रुग्ण विभागातही सोशल डीस्टंन्सिंग ठेऊन रुग्णांची तपासणी करण्यात येत आहे. पालकमंत्री व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी त्वरित या ग्रामीण रुग्णालयाच्या कारभाराकडे लक्ष देऊन येथील रिक्त पदे भरुन आरोग्य सेवा सुधारावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.