जालना - कोविड रुग्णालयात रुग्णसेवा करत असतानाच स्वतःला कोरोना झाला. स्वतःमुळे परिवारातील इतर दोन सदस्यांना ही त्याची लागण झाली. त्यानंतर कोरोनाच्या विळख्यातून स्वतःबरोबरच परिवारालाही बाहेर काढले. आता पुन्हा कोरोनाबाधित रुग्णांच्या सेवेत डॉ. प्रज्ञा कुलकर्णी रुजू झाल्या आहेत.
जिल्हा सामान्य रुग्णालयात 20 वर्षांपूर्वी वैद्यकीय अधिकारी म्हणून जबाबदारी घेतलेल्या प्रज्ञा कुलकर्णी यांना कोरोना बाधित रुग्णांची सेवा करता करता 24 जून रोजी त्यांना कोरोना झाला. त्यानंतर 26 जूनला 14 वर्षांची मुलगी सईला कोरोना झाला आणि या दोघांच्या संपर्कात आल्यामुळे 28 तारखेला प्रज्ञा यांचे पती डॉ. सुरेंद्र कोयाळकर यांनाही कोरोना झाला. एकाच घरातील आणि महत्त्वाची जबाबदारी असलेल्या या कुटुंबाला कोरोनाने घेरले होते. तिघेही सामान्य रुग्णांप्रमाणे सामान्य रुग्णालयातच भरती होऊन औषधोपचार घेत राहिले.
याबद्दल डॉ. प्रज्ञा म्हणाल्या, कामाप्रती आपली श्रद्धा आणि सचोटी असेल तर आपल्याला कशाचीच भीती वाटायचे कारण नाही. आम्ही दुसऱ्यांवर याच रुग्णालयात हे उपचार करत असू तर, आमचे आम्ही स्वतःवर उपचार येथे का करू नयेत? म्हणूनच आम्ही सामान्य रुग्णालयात उपचार घेतले आणि आजारातूनही बाहेर आलो आहोत. यामुळे आम्ही रुग्णांवर योग्य पद्धतीने उपचार करतो, याचीही खात्री झाली आणि कसल्याही प्रकारचा दुजाभाव स्वतःमध्ये आणि इतर रुग्णांमध्ये करत नाहीत, हा विश्वासही रुग्णांना मिळाला आहे.
खरंतर अशा धोकादायक ठिकाणी काम करत असताना आम्ही देखील सर्व काळजी घेतली होती. परिवारातील सहा सदस्यांपैकी सासू-सासरे हे वयस्कर असल्यामुळे त्यांना आम्ही आमच्यापासून अलिप्त ठेवले होते. मुलगा सार्थक हा देखील 19 वर्षांचा असून त्यालाही आम्ही बाजूच्या खोलीत राहण्याचा सल्ला दिला होता. मात्र, मुलगी स्वतंत्र राहू न शकल्याने तिला कोरोनाची बाधा झाली होती. घरातील तीनही सदस्यांना एकाच वेळी हा आजार झाल्यामुळे निश्चितच भीतीचे वातावरण होते. मात्र, रुग्णालयात आमच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी आणि कर्मचाऱ्यांनी चांगल्या प्रकारे काळजी घेऊन आम्हाला कोरोनाच्या विळख्यातून बाहेर काढले. दरम्यानच्या काळात घरी असलेल्या सासू-सासर्यांची काळजी आमच्या मित्रमंडळींनी घेतली आणि आज आम्ही पुन्हा एकदा नव्या जोमाने काम करत आहोत. काम करत असताना सकारात्मक दृष्टीकोन हा अत्यंत महत्त्वाचा ठरतो. त्यामुळे कदाचित मला झालेला कोरोना हा मी रुग्णांवर योग्य उपचार करते किंवा नाही, हे पाहण्यासाठी देखील झाला असेल आणि मी केलेले उपचार हे योग्य होते म्हणून मी त्यामधून बाहेर आले, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. आज पुन्हा रुग्ण सेवा करण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे रुग्णांची सेवा हाच आपला धर्म आहे, याची खात्री आपल्याला पटली असल्याचेही कोरोना मर्दिनी डॉ. प्रज्ञा म्हणाल्या.
हेही वाचा - नवरात्रोत्सवात मंठा येथील रेणुकामाता मंदिरात शुकशुकाट