जालना - राम मंदिर उभारण्यासाठी जालन्यात राममंदिर निधी संकलन समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीच्या 15 हजार 216 रामसेवकांनी 2 लाख 70 हजार 438 कुटुंबांशी संपर्क साधून 13 कोटी 38 लाख 90 हजार 313 रुपयांचा निधी संकलित केला आहे.
पत्रकार परिषदेत माहिती -
जालन्यातील उद्योजक घनश्यामजी गोयल यांच्या अध्यक्षतेखाली श्रीराम मंदिर निधी संकलन समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीचे उपाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य जयमंगल जाधव यांनी पत्रकार परिषद घेऊन या निधी संकलना विषयी माहिती दिली. त्यामध्ये हा निधी संकलित करण्यासाठी 15 हजार 216 रामसेवक फिरत होते. त्यांनी जिल्ह्यात 2 लाख 70 हजार 438 कुटुंबांशी संपर्क साधला आणि त्यामधून 13 कोटी 38 लाख 90 हजार 313 रुपये एवढा निधी जमा केला आहे. जिल्ह्यात गाव, वाडी वस्ती अशा विविध ठिकाणाहून स्वयंस्फूर्तीने हा निधी जमा झाला आहे. तत्पूर्वी निधी संकलनाच्या जनजागृतीसाठी जिल्ह्यात 700 शोभायात्रा निघाल्या. या शोभायात्रेमध्ये महिला, आबालवृद्ध यांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला. तसेच विविध वेशभूषा करून वाजत-गाजत या शोभायात्रा काढल्या. 38 महिला मेळाव्यांच्या माध्यमातून 1230 महिलांनी दहा पथनाट यांनी आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनीदेखील याविषयी जनजागृती केली.
गैरकृत्य नाही -
जमा झालेला एका-एका पैशाचा हिशोब समितीला मिळालेला आहे. तसेच हा सर्व व्यवहार अयोध्येतील श्रीराम मंदिर निधी संकलनाची जोडला गेलेला असल्यामुळे कोणताही गैरप्रकार झालेला नाही. सर्व निधी समितीच्या बँक खात्यात जमा करण्यात आला आहे. तसेच बनावट पावती पुस्तक किंवा अन्य प्रकारे कोणाचीही फसवणूक झाली नाही किंवा कोणालाही बळजबरी करण्यात आली नसल्याची माहिती या समितीचे उपाध्यक्ष जयमंगल जाधव यांनी दिली.
मदत कार्य सुरूच राहणार -
श्रीराम मंदिर उभारण्यासाठी स्थापित करण्यात आलेली निधी संकलन समिती ही नेमून दिलेले काम संपल्यामुळे बरखास्त करण्यात आलेले आहे. आता कोणीही अशा प्रकारचा निधी संकलित करणार नाही. मात्र, ज्या राम भक्ताला निधी देण्याची इच्छा आहे. तो हा निधी श्रीराम मंदिर निधी संकलन समितीच्या खात्यामध्ये थेट जमा करू शकतो, असेही जय मंगल जाधव यांनी सांगितले.