जालना - सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या 'पाझर' सेवाभावी संस्थेच्या १३ सदस्यांनी आज रक्तदान केले. सामान्य रुग्णालयातील शासकीय रक्तपेढीमध्ये या संस्थेच्या तेरा सदस्यांनी आज एकाच वेळी रक्तदान केले आहे. सामाजिक क्षेत्रात फक्त नावासाठी नव्हे तर एक सामाजिक बांधिलकी म्हणून ही संस्था सध्या अग्रेसर आहे.
संचारबंदीत गेल्या महिनाभरापासून शहरातील विविध भागांमध्ये जाऊन अन्न वाटपाचे कार्य ही संस्था करत आहे. विशेष म्हणजे कोणत्याही प्रसिद्धीशिवाय दिलेली जबाबदारी पार पाडणे हेच या संस्थेच्या सभासदांचे ध्येय आहे. संस्थेचे सुमारे अडीचशे पदाधिकारी आहेत आणि ते सर्वजण कोणाच्याही मदतीशिवाय हे कार्य करत आहेत. त्यामुळे या संस्थेचे नाव आता सामान्य माणसांपर्यंत जाऊन पोहोचले आहे. आज या पदाधिकाऱ्यांनी रक्तदान करतानाच रक्ताची गरज असलेल्या एका रुग्णाचे नातेवाईक आले आणि त्यांना लगेच अल्प दरांमध्ये हे रक्त उपलब्ध झाले आहे. त्यामुळे त्या रुग्णाच्या नातेवाईकांनी या रक्तदात्यांचे आभार मानले.