जालना - जिल्हाधिकारी कार्यालयातील निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गायकवाड यांच्या कार्यकक्षेत येणारे कर्मचारी उपजिल्हाधिकारी यांच्या कार्यप्रणालीला वैतागले आहेत. त्यामुळे या सर्वच कर्मचाऱ्यांनी आज त्यांची भेट घेऊन तक्रारींचा पाढा वाचला. गायकवाड यांना या पदावर जालन्यात रुजू होऊन अवघे चार महिने झाले आहेत. वेळेवर पगार न होणे, कर्मचाऱ्यांना उशिरापर्यंत थांबायला लावणे, या आणि अन्य तक्रारीही त्यांनी केल्या.
हेही वाचा - गोपीनाथ मुंडे साहेबांना अभिप्रेत महाराष्ट्र घडवेल, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मानले पंकजांचे आभार
आज सकाळीच हे सर्व कर्मचारी निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या दालनासमोर जमा झाले होते. मात्र, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गायकवाड हे लोकशाही दिनाच्या कार्यक्रमात असल्यामुळे त्यांची भेट होऊ शकली नाही. नंतर पुन्हा दुपारी जेवणाच्या सुट्टीनंतर हे कर्मचारी एकत्र आले आणि आपली तक्रार त्यांच्यासमोर मांडली. दरम्यान, आजच्या या प्रकरणानंतर कर्मचाऱ्यांना वेठीस धरण्याचे प्रकार थांबले नाहीत, तर आंदोलन करण्याचा निर्णय घ्यावा लागेल, असे या कर्मचाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, कार्यालयीन वेळेत हे कर्मचारी येत नसल्यामुळे आपण त्यांना योग्य सूचना आणि कार्यालयीन वेळ सांगितली आहे. त्यामुळे त्यांच्या अशा तक्रारी आहेत. यापुढे हजेरी मस्टर बंद करून बायोमेट्रिक सुरू करण्यात येणार असल्यामुळे कर्मचाऱ्यांना तक्रारीचा वाव राहणार नाही, असे गायकवाड यांनी सांगितले. जे कर्मचारी महिन्यातून तीन दिवस उशिरा येतात त्यांची एक दिवसाची रजा टाकण्याचा दंड असल्याचेही ते म्हणाले.
सकाळी 9:45 ते सायंकाळी 05:45 ही कार्यालयीन वेळ आहे. या दरम्यान काही कर्मचाऱ्यांना दुपारी दीड ते दोन तर काही कर्मचाऱ्यांना दोन ते अडीच अशी जेवणाची सुट्टी आहे.