जालना - जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस राहुल लोणीकर यांच्यावर कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोणीकर यांच्यासह भाजपच्या पदाधिकाऱ्यांवर पोलिसांनी बुधवारी गुन्हे दाखल केले आहेत.
राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा विरुद्धआंदोलन-
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख यांच्यावर एका तरुणीने बलात्काराचा आरोप केला आहे. या घटनेच्या निषेधार्थ भाजयुमोच्या वतीने बुधवारी आंदोलन करण्यात आले होते. मोतीबाग परिसरात करण्यात आलेल्या या आंदोलनाच्या प्रसंगी प्रचंड गर्दी जमा झाली होती. यावेळी भारतीय जनता पार्टीचे माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची देखील उपस्थिती होती. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत गुन्हे दाखल केले आहेत.
या कलमान्वये केला गुन्हा दाखल
कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल कैलास जावळे यांनी सरकारतर्फे तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार, साथरोग प्रतिबंधक कायदा 197 अन्वये कलम 2,3,4, तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51(ब) चे आंदोलकांनी उल्लंघन केले. तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी दिनांक 13 नोव्हेंबर रोजी काढलेल्या जमावबंदीचा आदेश धुडकावत सरकारविरोधी घोषणाबाजी केल्याचा आंदोलकांवर आरोप करण्यात आला आहे.
30 ते 40 कार्यकर्त्यांचा समावेश-
बुधवारी दुपारी 12 वाजताच्या सुमारास भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी प्रदेश सरचिटणीस राहुल लोणीकर यांच्यासह सुजित जोगस, संपत टकले, विक्रम उफाड, सचिन नारायणवाले, विनोद दळवी, पंकज कुलकर्णी, मधुसूदन दंडारे, नारायण पवार यांच्यासह तीस ते चाळीस जणांविरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.