जळगाव - जिल्ह्यातील यावल येथील स्मशानभूमीतून मृत महिलेच्या अस्थी चोरीला गेल्याची घटना घडली. अंत्यसंस्काराच्या दुसऱ्या दिवशी अस्थी चोरीला गेल्याचा प्रकार उघड झाला आहे. मृताचे नातेवाईक अस्थीसंकलनासाठी स्मशानात गेल्यानंतर ही घटना समोर आली.
मृत व्यक्तीचे कुटुंबीय अस्थी विसर्जनसाठी अस्थी घेण्यास गेले होते. त्यावेळी चक्क अस्थींची चोरी झाल्याची घटना लक्षात आली. याबाबत कुटुंबीयांनी यावल नगरपालिकेला घडलेल्या प्रकाराची माहिती देत यापुढे असे घडू नये, म्हणून दक्षता घेण्याचे निवेदन देण्यात आले आहे.
शहरातील एका महिलेचे मंगळवारी वृध्दापकाळाने निधन झाले होते. त्यांच्यावर शहरातील श्री महर्षी व्यास मंदिराजवळील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर मृत महिलेचे कुटुंबीय अस्थी संकलनासाठी गेल्यानंतर त्यांनी अस्थी चोरी झाल्याचे लक्षात आले. या प्रकरणी मृत महिलेच्या मुलाने नगरपालिकेकडे लेखी तक्रार दिली आहे. यावेळी त्यांनी स्मशानभूमीला वॉल कंम्पाऊंड करावे, सुरक्षा रक्षक नेमला जावा, अशी मागणी करण्यात आली आहे. यापूर्वी स्मशानभूमीत जळणाऱ्या प्रेताची काही समाजकंटकांकडून अवहेलना झाल्याच्या घटना घडल्या आहेत.