जळगाव - महाविकास आघाडी सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेतील एक प्रमुख योजना असलेल्या 'शिवभोजन थाळी' योजनेचे आज (रविवारी) राज्यभरात थाटात उदघाटन करण्यात आले. शहरात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते फीत कापून या योजनेचा शुभारंभ झाला. पालकमंत्र्यांनी ग्राहकांना थाळी वाढत योजनेचे उदघाटन केले खरे. मात्र, प्रत्यक्षात थाळीची चव घेणे टाळले.
जळगाव शहरात जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा रुग्णालय तसेच क्षुधा शांती केंद्र अशा 3 ठिकाणी शिवभोजन थाळी योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. याठिकाणी सर्वसामान्य नागरिकांना अवघ्या 10 रुपयांत जेवण उपलब्ध होणार आहे. रविवारी दुपारी साडेबारा वाजता पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे, महापालिका आयुक्त डॉ. उदय टेकाळे आदी उपस्थित होते.
हेही वाचा - मी जर शिवभोजन थाळी खाल्ली तर तुम्ही.... अजित पवारांची मिश्किल टिप्पणी
याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना गुलाबराव पाटील म्हणाले, सन 1995 मध्ये भाजप आणि शिवसेनेचे सरकार असताना सर्वसामान्य नागरिकांसाठी 'झुणका भाकर' योजना कार्यान्वित झाली होती. या योजनेला नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. मात्र, दुर्दैवाने ही योजना पुढे चालू शकली नाही. आता महाविकास आघाडी सरकारने सर्वसामान्य नागरिकांना केंद्रबिंदू मानून शिवभोजन थाळी योजना आणली आहे. या योजनेच्या माध्यमातून एकही नागरिक उपाशी राहणार नाही, अशी ग्वाही मी देत असल्याचे गुलाबराव पाटील म्हणाले.
हेही वाचा - पंढरीचा राजा सजला 'तिरंग्यात', प्रजासत्ताक दिनानिमित्त आकर्षक सजावट
फीत कापून योजनेचे उदघाटन झाल्यानंतर गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी एकत्रितरीत्या ग्राहकांना थाळी वाढून योजनेचा जळगावात श्रीगणेशा झाल्याचे जाहीर केले. गुलाबराव पाटील यांनी थाळीची चव न घेता केंद्र चालकांना जेवणाची गुणवत्ता टिकवून ठेवण्याचे आवाहन केले. दरम्यान, पहिल्याच दिवशी या योजनेला ग्राहकांचा उदंड प्रतिसाद लाभला. कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर ग्राहकांना 10 रुपयांत जेवण मिळाले.