जळगाव - शहरातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी महापालिकेने जास्तीत जास्त स्वॅब घेऊन तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार अवघ्या अर्ध्या तासात अहवाल देणाऱ्या अँटिजेन टेस्टिंगच्या सुमारे १० हजार किट खरेदी केल्या जाणार आहेत. आयसीएमआरच्या यादीतील मान्यताप्राप्त ‘माय लॅब’ या कंपनीकडून शुक्रवारपर्यंत पालिकेला पुरवठा केला जाणार आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने सुरू आहे. जळगाव शहरातही वाढलेला संसर्ग मध्यंतरी थोडा कमी झाला होता. मात्र, यात आता पुन्हा वाढ झाल्याचे दिसून आले. शहरातील ६५० भागात कंटेन्मेंट झोनची अंमलबजावणी करण्यात येत आहे. नागरिकांमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्याने तपासणीसाठी येणाऱ्यांचे प्रमाणदेखील वाढले आहे. दररोज महापालिकेकडून सुमारे २५० ते ३२० जणांची तपासणी केली जात आहे. त्यामुळे गेल्या आठवड्यात मागवण्यात आलेल्या ३ हजार अँटिजेन किट लवकरच संपण्याची शक्यता आहे. त्यामुळे रुग्णांच्या कोरोनाच्या तपासणीत खंड पडू नये, म्हणून महापालिका प्रशासनाने उपाययोजनांच्या दृष्टीने नवीन १० हजार किट खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.
एका किटमागे दहा रुपयांची बचत
आयसीएमआरच्या यादीतील चार प्रमुख कंपन्यांकडून कोरोनाशी निगडित साहित्य खरेदी करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार महापालिकेकडून आतापर्यंत एका किटसाठी ४५० रुपये आणि जीएसटी असा खर्च केला जात होता. परंतु, मान्यताप्राप्त माय लॅब या कंपनीच्या अँटिजेन किटचा दर हा ४४० रुपये आणि जीएसटी असा आहे. त्यामुळे एका किटमागे दहा रुपयांची महापालिकेची बचत होणार आहे. यातून पालिकेची एक लाखाची बचत होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
कोरोनावर उपाययोजनांसाठी राष्ट्रीय आरोग्य मिशनकडून पालिकेला १ कोटी २३ लाखांचा निधी प्राप्त झाला आहे. या रकमेतून अँटिजेन खरेदी करण्याची प्रक्रिया लांबण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालिका प्रशासन सध्या मनपा फंडातून ४९ लाख ८२ हजार रुपये खर्च करून १० हजार अँटिजेन खरेदी करीत आहे. त्यासाठी ‘माय लॅब’ या मान्यताप्राप्त कंपनीकडे खरेदीची नोंदणी केली आहे. किट प्राप्त झाल्यानंतर एनएचएम अंतर्गत प्राप्त निधीतून मंजुरीनंतर पालिकेची खर्च झालेली रक्कम समायोजित केली जाणार असल्याची माहिती उपायुक्त संतोष वाहुळे यांनी दिली.