जळगाव - भारतात सीरम इन्स्टिट्यूटच्या कोविशिल्ड लसीला केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. आता लवकरच लसीकरणाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. या अनुषंगाने, जळगाव जिल्ह्यात लसीच्या वितरणाच्या दृष्टीने स्थानिक पातळीवर प्रशासनाकडून नियोजन सुरू आहे. जिल्ह्यातील 16 हजार 78 हेल्थ वर्कर्सला पहिल्या टप्प्यात कोरोनाची लस दिली जाणार आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात फ्रंटलाईन वर्कर्सला ही लस देण्याचे नियोजन असून, त्यासाठी जिल्हा पोलीस दलाची पूर्वतयारी झाली आहे. याकरिता जवळपास साडेतीन हजार पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची माहिती संकलित करण्यात आली असल्याची माहिती जळगावचे अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी दिली आहे.
केंद्रीय गृहमंत्रालयाला माहिती सादर -
फ्रंटलाईन वर्कर्समध्ये पोलीस, गृहरक्षक दल, सैन्यदल, पॅरामिल्ट्री फोर्स यांचा समावेश होतो. कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात फ्रंटलाईन वर्कर्स प्राधान्य असणार आहे. त्यासाठी केंद्र व राज्य सरकारने संबंधित यंत्रणेला माहिती सादर करण्याचे निर्देश दिलेले होते. त्या अनुषंगाने, जळगाव जिल्हा पोलीस दलाच्यावतीने कोरोना लसीकरणाची पूर्वतयारी करण्यात आली. त्यात 3 हजार 421 पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची माहिती संकलित करून ती केंद्रीय गृहमंत्रालयाला सादर करण्यात आली आहे. या कामासाठी अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांची कोरोना नोडल ऑफिसर म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
पहिल्या दोन टप्प्यात सुमारे 20 हजार जणांना लाभ -
जळगाव जिल्ह्यात कोरोना लसीकरणाच्या पहिल्या दोन टप्प्यात हेल्थ वर्कर्स तसेच फ्रंटलाईन वर्कर्स मिळून सुमारे 20 हजार जणांना कोरोनाची लस दिली जाणार आहे. त्यात 16 हजार हेल्थ वर्कर्स तर साडेतीन हजारांहून अधिक फ्रंटलाईन वर्कर्सचा समावेश असेल. कोरोनाची लस पहिल्या टप्प्यात 13 हजार 245 शासकीय कर्मचाऱ्यांना तर 2 हजार 833 खासगी यंत्रणेतील कर्मचाऱ्यांना दिली जाणार आहे. खासगी यंत्रणेतील 10 टक्के कर्मचाऱ्यांची माहिती प्रशासनाकडे येणे अद्यापही बाकी आहे. खासगी यंत्रणेतील कर्मचाऱ्यांच्या माहितीचे संकलन सुरू असल्याची माहिती मिळाली.
येत्या 15 दिवसांत लसीकरणाची शक्यता -
जळगाव जिल्ह्यात येत्या 15 दिवसांत कोरोनाच्या लसीकरणाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. एका आरोग्य केंद्रावर एकाच वेळी 100 तर उपकेंद्रावर 50 आरोग्य कर्मचाऱ्यांना ही लस दिली जाणार आहे. जिल्ह्यात सुमारे 200 बूथ यासाठी उभारण्यात येणार आहे. एका बुथवर 5 कर्मचारी असणार आहेत. राज्य सरकारकडून लसीकरणाबाबत मार्गदर्शक सूचना आल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाणार आहे.
हेही वाचा - रत्नागिरी : सेल्फी काढताना हेदवी किनाऱ्यावर दोन पर्यटक बुडाले