जळगाव - तालुक्यातील नशिराबाद येथील 82 उमेदवार ग्रामपंचायत निवडणुकीसाठी इच्छुक होते. या सर्वांनी आपले उमेदवारी अर्ज देखील दाखल केले होते. परंतु, आज (सोमवार) अर्ज माघारीच्या दिवशी सर्वच इच्छुक उमेदवारांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली. नशिराबाद ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रुपांतर झाले असून, राज्याच्या नगरविकास विभागाने नुकताच त्याबाबतचा शासन निर्णय जाहीर केला आहे. म्हणून निवडणुकीच्या रिंगणातील उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले.
राज्यातील 13 ग्रामपंचायतींचे नगरपंचायतीत रुपांतर करण्याबाबतचा प्रस्ताव राज्याच्या नगरविकास विभागाकडे आलेला होता. यात जळगाव तालुक्यातील नशिराबाद ग्रामपंचायतीचा देखील प्रस्ताव होता. या प्रस्तावावर राज्य शासनाकडून निर्णय होण्याआधीच राज्य निवडणूक आयोगाकडून ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. त्यामुळे नशिराबाद ग्रामपंचायतीची देखील निवडणूक जाहीर झाली होती. यात निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्या ग्रामस्थांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असतानाच 29 डिसेंबर रोजी नगरविकास विभागाकडून नशिराबाद ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रुपांतर करण्याबाबतचा निर्णय जाहीर करण्यात आला. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये निवडणूक लढवावी किंवा नाही, याबाबत संभ्रमाचे वातावरण होते.
निवडणूक आयोगाकडून प्रक्रियेला स्थगिती नाहीच-
नशिराबाद ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रुपांतर करण्याबाबत आदेश जारी केल्यानंतर नशिराबाद ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्यासंदर्भात नगरविकास विभागाने राज्य निवडणूक आयोगाला पत्र पाठवले होते. परंतु, निवडणूक आयोगाकडून निवडणूक प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली नाही. अशातच निवडणूक होईल किंवा नाही, याबाबत संभ्रम कायम होता. अशातच सर्वपक्षीय उमेदवारांसह ग्रामस्थांनी एकत्र येऊन निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. निवडणूक प्रक्रियेमुळे राज्य शासनाचा खर्च होऊ नये म्हणून सर्व उमेदवारांनी आपले अर्ज सोमवारी सायंकाळी मुदतीत मागे घेतले.
पालकमंत्र्यांनी मानले ग्रामस्थांचे आभार-
दरम्यान, राज्य शासनाला सहकार्य म्हणून नशिराबादच्या ग्रामस्थांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रक्रियेतून माघार घेतल्याने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी नशिराबादकरांचे आभार मानले. जळगाव तहसील कार्यालयात येऊन गुलाबराव पाटील यांनी नशिराबादच्या ग्रामस्थांशी चर्चा केली. नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी शासनाकडे योग्य तो पाठपुरावा करण्याचे आश्वासन देखील त्यांनी ग्रामस्थांना दिले.
हेही वाचा- 'औरंगाबाद नामांतरबाबत सरकारने जनभावनेचा आदर करावा'