हिंगोली - शहरात दिवसेंदिवस चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत. चोरटे वेगवेगळे फंडे वापरत डल्ला मारत आहेत. अशातच कळमनुरी येथे चोरट्याने अंगावर खाजेचे औषध टाकून एक लाख रुपयांची रक्कम पळविली. ही घटना 3 डिसेंबर रोजी घडली. या प्रकरणी कळमनुरी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोयाबीन विकून मिळाली होती रक्कम-
रामचंद्र मारुती जाधव हे शेतकरी सोयाबीन विकून मिळालेली एक लाख रुपयाची रक्कम स्टेट बँकेत भरण्यासाठी निघाले होते. दरम्यान, जाधव यांचे अंग अचानक खाजवण्यास सुरुवात झाली. त्यांनी सर्वप्रथम बँकेत जाण्याचे टाळले. जाधव हे उपचारासाठी डॉ. सोमाणी यांच्या खासगी रुग्णालयात गेले. तेथे उपचार करीत असताना, एक लाख रुपयांची रक्कम असलेली पिशवी खुर्चीवर ठेवली. त्यानंतर जाधव बाहेर आले असता खुर्चीवर ठेवलेली पिशवी गायब झाल्याचे दिसून आले.
थेट गाठले पोलीस ठाणे-
सर्वत्र पाहणी केल्यानंतर रक्कम कुठेही आढळून आलेली नाही. त्यामुळे रक्मक चोरी गेल्याचे स्पष्ट झाल्यानंतर जाधव यांनी थेट कळमनुरी पोलीस ठाणे गाठले. या प्रकरणी तक्रार दिल्यानंतर अज्ञात चोरट्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद-
कळमनुरी पोलिसांनी बँक परिसरात आणि विविध दुकानात लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीची तपासणी केली. मात्र त्यामध्ये कुठेही चोरटे आढळून आलेले नाहीत. ज्या रुग्णालयामध्ये जाधव उपचारासाठी गेले होते. तेथील सीसीटीव्हीमध्ये जाधव यांनी खुर्चीवर ठेवलेली पिशवी दिसली. तोंडावर मास्क घातलेल्या एका चोरट्याने पिशवी पळवली. मास्कमुळे चोरट्याची ओळख पटली नाही. परंतु, त्याच्या वेशभूषेनुसार पुढील तपास केला जात आहे. एकूण तीन पथके चोरट्यांच्या शोधासाठी रवाना झाल्याचे पोलीस उपनिरीक्षक एफ. एस. सिद्दीकी यांनी संगितले.
हेही वाचा- मुलीच्या संगोपनासाठी पत्नीकडूनच पैशाची मागणी; ठाण्यातील धक्कादायक प्रकार
हेही वाचा- शेतकऱ्यांच्या भारत बंदला आपचा पाठिंबा, कार्यकर्ते ८ डिसेंबरला रस्त्यावर उतरणार