हिंगोली - जिल्हा दौऱ्यावर असलेले आयुक्त सुनील केंद्रेकरांनी त्यांच्या मूळगावी (केंद्रा बुद्रुक) भेट दिली. आयुक्तांना खराब झालेले सोयाबीन दाखवताना शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू दाटून आले. मात्र, आयुक्तांसमोरच जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी शेतकऱ्याच्या अश्रूंना नाटकी म्हणत, शेतकऱ्याला ताब्यात घेण्याच्या सूचना सुरक्षा रक्षकांना दिल्या. खुद्द आयुक्तांच्या गावातच संकटात असलेल्या शेतकऱ्यांची खिल्ली उडवल्याचा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे.
नामदेव पतंगे असे या शेतकऱ्याचे नाव आहे. आयुक्त आपल्या मूळगावी येणार असल्याने, मोठ्या संख्येने शेतकरी त्यांच्या प्रतीक्षेत थांबले होते. आयुक्त आल्यानंतर पतंगे यांनी खराब झालेले सोयाबीन घेऊन आयुक्तांसमोर धाव घेतली. जिल्हाधिकारी जयवंशी यांनी पतंगे यांना ड्रामेबाज म्हणत त्यांना ताब्यात घेण्याच्या सूचना सुरक्षा रक्षकांना दिल्या.
हेही वाचा - महाराष्ट्र सत्ता पेच : काँग्रेस नेत्यांनी घेतली सोनिया गांधींची भेट; दोन-तीन दिवसात होणार अंतिम निर्णय
यानंतर आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांना शांत करत त्या शेतकऱ्याला समोर बोलावून त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. विमा कंपनी पीक विमा देण्यासाठी टाळाटाळ करत असल्याची तक्रार पतंगे आणि इतर शेतकऱ्यांनी केली. याबाबत कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना दिल्याचे आयुक्त केंद्रे यांनी सांगितले.
हेही वाचा - केंद्र सरकारचा कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद पाडण्याचा घाट ? सभापतींनी लिहले राज्यपालांना पत्र
मात्र, आयुक्तांसमोर शेतकऱ्यांचे अश्रू जिल्हाधिकाऱ्यांना नाटकी वाटल्यामुळे खळबळ उडाली आहे. घडलेल्या प्रकाराचा आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या वक्तव्याचा शेतकरी वर्गातून निषेध व्यक्त केला जात आहे.
केंद्रा गावाचा होणार कायापालट -
मूळगाव असलेल्या केंद्रा गावात अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यास संबंधित अधिकाऱ्यांना आयुक्तांनी सूचना दिल्या. गावातील विविध समस्यांचा आराखडा तयार करण्यासही अधिकाऱ्यांना सुनावले. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (एमआरजीएस) जास्तीत जास्त विहिरींची निर्मिती करण्यात यावी. शालेय शिक्षकांची भरती, शेतकरी कर्ज याबाबत तत्काळ कार्यवाही करण्याचे आदेश आयुक्तांनी दिल्याने केंद्रा गावाचा कायापालट होण्याची आशा गावकऱ्यांना आहे.