हिंगोली - रेशन घोटाळ्याच्या बाबतीत नेहमीच चर्चेत असलेल्या जिल्ह्यात यावेळी तर चक्क विद्यार्थ्यांना दिला जाणारा शालेय पोषण आहार टेम्पोने (MH26 AD536) काळ्या बाजारात विक्री केला जात आहे. जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील शिरळी येथील नागरिकांनी आज हा धक्कादायक प्रकार उघडकीस आणला.
शाळा सुरू झाल्या आणि दरवर्षीप्रमाणे शिक्षण विभागाच्या वतीने शाळांना शालेय पोषण आहार पोहोचविण्याची प्रक्रिया सुरू झाली. विविध वाहनधारकांना कंत्राट देण्यात आले. मात्र, वाहन चालक आणि हमालांनी टेम्पोद्वारे शालेय पोषण आहार काळ्याबाजारात विक्री करत असल्याचे आज निदर्शनास आले. शिरळी येथील नागरिकांनी थेट टेम्पो ताब्यात घेत घटनेची माहिती कुरुंदा पोलिस ठाण्याला दिली. घटनास्थळी कुरुंदा पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी धाव घेतली असून पुढील चौकशी सुरू केली आहे.
दरम्यान प्रकरणाची चौकशी सुरू असून या प्रकरणात नागरिकांच्या फिर्यादीवरून योग्य तो गुन्हा दाखल करणार असल्याचे कुरुंदा पोलीस ठाण्याचे पोनी येरेकर यांनी सांगितले. मात्र, शालेय पोषण आहार चोरीचा प्रकार कित्येक दिवसापासून सुरू असावा असाही प्रश्न सामान्य नागरिकांच्या चर्चेत येत आहे. या प्रकरणात होणाऱ्या कारवाईकडे सर्वांचेच लक्ष लागले असून कंत्राटदाराच्या काळ्याबाजाराचा मनस्ताप मात्र शिक्षण विभागाला सहन करावा लागणार आहे.