हिंगोली - जिल्ह्यात सध्या भीषण पाणीटंचाई जाणवत आहे. अशा परिस्थितीत एका दिलदार शेतकऱ्याने आपल्या दीड एकर शेतातील उसाला पाणी देणे थांबवून गावासाठी पाणी मोकळे करून दिले आहे. हा शेतकरी एवढयावरच थांबला नाही. तर शेतातून पाईपलाईनद्वारे गावात पाणी आणले असून दिवसभर हातात पाईप धरून पाण्यासाठी येणाऱ्यांची भांडी भरून देत आहेत. त्यामुळे या शेतकऱ्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
सीताराम रामचंद्र घुगे (रा. असोंदा) असे या दिलदार शेतकऱ्याचे नाव आहे. या शेतकऱ्याला ४ एकर शेती असून दीड एकर शेतीमध्ये ऊस आहे. मात्र, यावर्षी जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई जाणवत असल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. अशीच परिस्थिती असोंदा येथील ग्रामस्थांची असून ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत होते. ही बाब लक्षात घेऊन शेतकरी घुगे यांनी आपल्या शेतातील ऊसासह इतर पिकाला पाणी देणे थांबवून ग्रामस्थांसाठी मोफत पाणी खुले केले.
घुगे यांनी ऐन पाणीटंचाईच्या काळात ग्रामस्थांसाठी गावात पाणी उपलब्ध करून दिल्यामुळे ग्रामस्थांची भटकंती थांबण्यास मदत झाली. दरवर्षीच या गावात पाणी टंचाईचे मोठे संकट निर्माण होते. त्यामुळे बरेच ग्रामस्थ पाणीटंचाईला कंटाळून बाहेरगावी स्थलांतरित झालेले आहेत. तर याच भागात काहींनी पाणी विक्रीचा व्यवसाय सुरू करून लाखों रुपये कमवित आहेत. तर दुसरीकडे मात्र आपल्या शेतातील पिकाची जराही पर्वा न करता चक्क घुगे यांनी गावासाठी पाणी उपलब्ध करून दिले आणि तेही मोफत. त्यामुळे या शेतकऱ्याचे जिल्हाभरात कौतुक होत आहे.
एप्रिल महिन्यातच दुष्काळाचे चटके लागत असल्यामुळे ग्रामस्थ चांगलेच हैराण झालेले आहेत. अशा परिस्थितीत आपल्या पिकाची जराही पर्वा न करता घुगे यांनी गावासाठी मोफत पाणी उपलब्ध करून देण्याची संकल्पना खरोखरच खूप काही सांगून जाणारी आहे. घुगे यांनी गावात पाणी उपलब्ध करून दिल्यामुळे महिला व युवक वर्गातूनही मोठे समाधान व्यक्त होत आहे. घुगे म्हणतात, की पिकांपेक्षा माणुसकी खुप महत्वाची आहे. गावाला मोफत पाणी देण्यातच खुप समाधान वाटत आहे. तसेच चारा टंचाई असल्याने त्याच दीड एकर ऊसात गुरेही चरण्यासाठी सोडली आहेत.
हिंगोली जिल्ह्यात यंदा भीषण पाणीटंचाई जाणवत असल्याने चाळीसच्यावर गावांची तहान ही टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहे. त्यामुळे पाणीटंचाईवर मात करण्यासाठी घुगे सारखेच अनेक दानशूर शेतकऱ्यांनी पुढे येण्याची गरज आहे. प्रशासन ही पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रयत्नशील असले तरी दानशूर शेतकऱ्यांची गरज आहेच.