हिंगोली- मराठा आरक्षणापाठोपाठ आता ओबीसीचा राजकीय आरक्षणाचा ही मुद्दा चांगलाच गाजतोय. संपूर्ण राज्यामध्ये ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी भाजपा रस्त्यावर उतरली आहे. त्याच पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्ह्यातही भाजपाच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आले. सेनगाव येथे भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी आंदोलन केले आहे. आंदोलनात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांना कोरोनाचे नियम पाळण्यासंदर्भात वारंवार सूचना दिल्या जात होत्या. तसेच प्रत्येकाला मास्क वाटण्यात आले. दरम्यान, अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिस प्रशासनाच्यावतीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
कोरोना नियमांचे पालन -
जिल्ह्याभरातून कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले आहेत. कार्यकर्त्यांना कोरोना नियमांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत. सहभागी होणाऱ्यांना मास्कचे देखील वाटप करण्यात आले.
ओबीसीला आरक्षणावरून सरकारवर ओढले ताशेरे..
ओबीसी समाजाला आरक्षण न दिल्यामुळे त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे, असे म्हणत भाजपा पदाधिकाऱ्यांनी सरकारवर ताशेरे ओढले आहेत. हे दळभद्री सरकार जाणीवपूर्वक ओबीसी सह सर्व समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. या सरकारला जाब विचारण्यासाठी हे चक्काजाम आंदोलन असल्याचे आंदोलकांनी सांगितले. ओबीसी समाजाला आरक्षण मिळेपर्यंत भाजपाच्या वतीने असाच लढा सुरू राहणार असल्याचेही यावेळी आंदोलकांनी सांगितले.
रस्ता रोकोमध्ये पदाधिकारी सहभागी..
या आंदोलनात ओबीसी आणि मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. गरीब कष्टकरी जनतेला आरक्षण दिले तर यांच्या आयुष्यातील प्रश्न मार्गी लागेल. मात्रा स्वतःमध्ये मशगुल असलेले सरकार हे ओबीसी आरक्षणाकडे अजिबात लक्ष देत नसल्याचा आरोप यावेळी आंदोलकांनी केला आहे.