हिंगोली - कोरोनामुळे सर्वांचेच जीवन अडचणीचे ठरले आहे. कोरोनाला हरवण्यासाठी प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी जीवाची जराही पर्वा न करता स्वतःला झोकून देत काम करत आहेत. अशातच एका पित्याला या लॉकडाऊनच्या गडबडीत आपल्या लाडक्या लेकीच्या वाढदिवसालादेखील जाता आले नाही. त्यामुळे त्यांनी फेसबुक पोस्टद्वारे मन मोकळे करून लेकीच्या वाढदिवसाला हजर न राहू शकल्याची खंत व्यक्त केली आहे. या पित्याची भावनिक पोस्ट कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अहोरात्र राबणाऱ्या अनेक पित्यांच्या मनातील शब्दांचा जणू साठाच ठरली आहे.
रामदास पाटील असे या पित्याचे नाव असून, ते हिंगोली नगर पालिकेत मुख्याधिकारी पदावर कार्यरत आहेत. जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झालाय तेव्हापासून जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची टीम अहोरात्र कोरोनाचा सामना करण्यासाठी राबत आहे. त्यापैकीच एक महत्वाची टीम म्हणजे मुख्याधिकारी रामदास पाटील यांची आहे. राज्य राखीव दलातील जवान कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर पाटील यांनी शहराची सफाई कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून अनेकदा साफसफाई केली. ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर, शहरातील गल्लीबोळींचेही निर्जंतुकीकरण केले. दिवसरात्र एक करून शहरातील स्वच्छतेकडे लक्ष दिले. या घाईगडबडीत आपल्या कुटुंबाकडे लक्ष राहणार नाही, म्हणून त्यांनी कुटुंबाला मुलीच्या मामाकडे नेऊन सोडले. अन् शहरातील कोरोना आटोक्यात आणण्यासाठीचे प्रयत्न करत स्वतःला वाहुन दिले.
गेल्या अडीच महिन्यापासून सातत्याने शहरातील साफसफाईकडे लक्ष दिले जात आहे. दिवसेंदिवस दिवस कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. त्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अन् नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या संपामुळे पाटील यांना मुलगी कार्तिकीच्या सहाव्या वाढदिवसालाही जाता आले नाही. एवढेच नव्हे तर कामाच्या ओघात कुटुंबाशी बोलता देखील आले नसल्याने ही सारखी त्यांच्या मनात बोचत राहिली. त्यामुळे पाटील यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून लेकीला शुभेच्छा दिल्या. त्यांची ही भावनीक पोस्ट पाहून या महामारीच्या काळात राबराब राबणाऱ्या प्रत्येक पित्याला आपल्या कुटुंबाची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. कोरोनामुळे सर्वत्र विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे. तर, अजूनही रुग्ण आढळतच असल्याने, भविष्यात काय होईल याची प्रत्येकाला चिंता पडली आहे.