जालना - कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवामध्ये समस्त जालनेकर रत्नागिरीच्या हापूस आंब्यावर ताव मारताना दिसत आहेत. रत्नागिरीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मधुकर दळवी यांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरीतील शेतकऱ्यांची टीम जालन्यात आली आहे.
या आंबा महोत्सवात फळाविषयी माहिती आणि अस्सल फळ ओळखण्याची पद्धत याविषयी देखील दळवी ग्राहकांना माहिती देत आहेत. आंबा महोत्सवांमध्ये फक्त रत्नागिरी येथीलच दहा ते बारा शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला आहे. सुमारे दोनशे रुपये डझन पासून सहाशे रुपये डझन पर्यंत वेगवेगळ्या गुणवत्तेचे आंबे प्रदर्शनांमध्ये पाहण्यासाठी आणि विक्रीसाठी उपलब्ध आहेत. ग्राहकांची वाढती मागणी लक्षात घेता आज परत रत्नागिरीतून आंबा मागवण्यात आल्याची माहितीही दळवी यांनी दिली.