गोंदिया - कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे देशभरात लॉकडाऊन करण्यात आले होते. या लॉकडाऊन काळात सर्वच उद्योग ठप्प झाल्यामुळे अनेकांवर आर्थिक संकाटाची कुऱ्हाड कोसळली. अनेक मेट्रो शहरातील तसेच इतर ठिकाणी असलेल्या उद्योग, व्यवसायांमध्ये कर्मचारी कपात करण्यात आली. कोरोनाच्या भीतीमुळे लाखो कामगार आपल्या स्वगृह परतले. अशाच परिस्थितीत मात्र, येथील एका महिलेने आत्मनिर्भर होत अनेक महिलांना रोजगार देत आदर्श निर्माण केला आहे. प्रीती टेमभरे असे या महिलेचे नाव आहे.
प्रीती यांनी गाईच्या शेणापासून राख्या बनविण्याचे प्रशिक्षण देत महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. त्यांनी बनवलेल्या या इको फ्रेंडली राख्यांना जिल्ह्यासह राज्यात तसेच दुसऱ्या राज्यातही मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे.
गोंदिया तालुक्यातील चुटिया येथील ऋषी टेमभरें आणि त्यांची पत्नी प्रीती टेमभरें या दोघांनी पाच वर्षा आधी गावात गीर प्रजातीच्या गायीची गौशाळा उघडली. या गौशाळेला फक्त दुधापर्यंत मर्यादित न ठेवता या गाईच्या शेणापासून सेंद्रिय खते, अगरबत्ती तयार केली. तर गौमुत्रापासून फिनाईल, औषधेही तयार केली जातात.
कोरोनाच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणातून जनतेला आत्मनिर्भर होण्याचा सल्ला दिला होता. त्यात आता भारत-चीन सीमावादामुळे चीनी वस्तूवर बहिष्कार टाकण्यात येत आहे. हीच परिस्थिती लक्षात घेतात प्रीती यांना रक्षा बंधनाच्या उत्सवात गाईच्या शेणापासून इको फ्रेंडली राखी बनविण्याची संकल्पना सुचली. त्यांनी कामाला सुरुवात करत आधी या संकल्पनेबाबत अभ्यास केला आणि यानंतर आपली ही संकल्पना साकार केली.
आतापर्यंत त्यांनी गाईच्या शेणापासून जवळपास ६ हजार इको फ्रेंडली राख्या तयार केल्या. जिल्ह्यात, राज्यासह या राख्यांना मागणी येत आहे. इतकेच नव्हे तर गुजरात, मध्यप्रदेश, केरळ, राजस्थान सारख्या इतर राज्यांतही या राख्यांना मागणी आहे. या माध्यमातून त्यांनी गावातील अनेक महिलांना रोजगार उपलब्ध करुन दिला आहे. त्यांना रोजगाराशी संबंधित प्रशिक्षणही द्यायला सुरुवात केली आहे. गाईच्या शेणापासून राखी कशाप्रकारे तयार करता येते, हेदेखील शिकवण्यात आले.
राखी कशी तयार केली जाते?
आधी शेणाच्या गौऱ्या तयार केल्या जातात. त्यांनतर त्याची बारीक प्रमाणात पावडर तयार केली जाते. त्यानंतर डिंक, गुळ, चिंचेच्या बिया याला एकत्र करून मिश्रण तयार करण्यात येतात. मग यापासून राख्या बनविण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे साचे वापरले जातात आणि फुलपाखरू, सुर्यफुल, स्वस्तिक या प्रकारच्या राख्या तयार केल्या जातात.
प्रीती टेमभरें यांच्या लघु उद्योगात त्याचे पती ऋषी टेमभरें हे मार्केटींगचे काम पाहतात. आपल्याकडे तयार केलेल्या राख्या बाजारात विक्रीकरीता जाताना कुठलीही कमी राहू नये, राख्यांना पॅक करुन पोहोचवणे याकडे प्रीती यांच्या जाऊ स्वेता टेमभरें विशेष लक्ष देतात. तर गाईपासून फक्त दूध न मिळविता, तिच्यापासून मिळणाऱ्या शेणापासून औषधे, राख्या बनविणे इतकेच मर्यदित न राहता गौहत्या थांबविणे हा या मागचा मुख्य उद्देश आहे, अशी भावना प्रीती यांनी 'ईटीव्ही भारत'सोबत बोलताना व्यक्त केली. तसेच त्यांनी राखीच्या मागच्या भागावर गायी वाचविण्याचा सामाजिक संदेशही दिला आहे. तर यापुढे गाईच्या शेणापासून दिवाळीनिमित्त इको फ्रेंडली दिवेदेखील बनविणार असल्याचे त्यांनी सांगितले.