गडचिरोली - अतिसंवेदनशील नक्षलप्रभावित गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघातील ४ विधानसभा मतदारसंघात दुपारी ३ वाजेपर्यंत मतदान पार पडले. मात्र, धानोरा तालुक्यातील येरकड मतदान केंद्रावर पोहोचण्यासाठी परिसरातील १० गावांतील मतदारांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. त्यामुळे आदिवासी मतदारांनी 'ना वाहन पोहोचले, ना व्हीलचेअर', असे सांगत प्रशासनावर रोष व्यक्त केला आहे.
धानोरा, कोरची, एटापल्ली आणि भामरागड तालुक्यातील अनेक मतदान केंद्रांवर ८ ते १० गावातील मतदारांचे मतदान होते. त्या मतदारांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचवण्यासाठी वाहन व अपंग मतदारांसाठी व्हिलचेअरची व्यवस्था करण्यात आली होती. तर धानोरा तालुक्यातील येरकड मतदान केंद्र अतिसंवेदनशील आहे. या मतदान केंद्रावर परिसरातील सिंदेसूर, कुसुमटोला, मेवाड, रिंगाटोला, कन्हारटोला, टवेटोला, मुंजालगोंदी, दराची, गटानेली येरकड या १० गावांतील मतदारांचे मतदान होते. ही दहाही गावे येरकडपासून जवळपास ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहेत. त्यामुळे येथील मतदारांना मतदान केंद्रावर पोहोचवण्यासाठी प्रशासनाकडून किंवा उमेदवारांकडून वाहनाची व्यवस्था करण्याची गरज होती. परंतु तेथे वाहनाची व्यवस्था करण्यात आली नाही.
प्रशासनाकडून मतदानासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आल्याने मतदान केंद्रावर पोहोचवण्यासाठी वाहने उपलब्ध होतील, अशी आशा येथील आदिवासी मतदारांना होती. मात्र ना प्रशासनाचे, ना उमेदवाराचे वाहन तेथे पोहोचले. त्यामुळे येथील नागरिकांना दुचाकी, चारचाकी किंवा पायीच मतदान केंद्र गाठून मतदान करावे लागले.
मुंजालगोंदी येथील एका ६० वर्षीय वयोवृद्धाने पायपीट करीत मतदानासाठी आल्याचे 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले. आपण अपंग असतानाही मतदान केंद्राच्या गेटवरून व्हिलचेअरची व्यवस्था नव्हती. घरून सकाळीच निघूनही मतदान केंद्रावर गर्दी असल्याने दुपारपर्यंत मतदान होणार नाही. अशाने आमची गैरसोय होत आहे, असेही ते म्हणाले. इतर नागरिकांनीही चर्चा करताना प्रशासनाच्या कार्य प्रणालीवर रोष व्यक्त केला.