गडचिरोली - जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी पुन्हा प्रंचित पोरेड्डीवार यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांची बँक म्हणून जिल्हा मध्यवर्ती बँकेला ओळखले जाते. नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील अनेक दुर्गम गावांमध्ये राष्ट्रीयकृत बँका नाही. मात्र जिल्हा मध्यवर्ती बँकेने शेकडो शाखा ग्रामीण भागात सुरू केल्याने या बँकेला ग्राहकांची विशेष पसंती आहे. बँकेच्या 21 संचालक मंडळाची 6 फेब्रुवारी रोजी बिनविरोध निवड झाली. राज्याच्या सहकार क्षेत्रात नावाजलेल्या गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती बँकेवर आजवर पोरेड्डीवार गटाचे वर्चस्व राहिले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा अध्यक्षपदी प्रंचित पोरेड्डीवार यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.
बिनविरोध निवड जाहीर
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण व जिल्हा सहकारी निवडणूक अधिकाऱ्यांनी गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती बँकेचा निवडणूक कार्यक्रम लावला होता. जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) यांनी निवडणुकीसंदर्भात अधिसूचना काढली होती. त्यानुसार 14 जानेवारीला निवडणूक कार्यक्रम जाहीर होऊन 20 जानेवारीपर्यंत नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यात आले. मात्र 21 संचालकांच्या जागांसाठी 21 जणांचेच नामांकन आले. 21 जानेवारीला नामांकनाची छाननी झाली. 22 जानेवारीला पात्र उमेदवारांची सूची प्रसिद्ध करण्यात आली. 5 फेब्रुवारीपर्यंत नामांकन मागे घेण्याची मुदत होती. मात्र जेवढ्या जागा तेवढेच नामांकन आल्याने कोणीही निवडणुकीतून माघार घेतली नाही. त्यामुळे 6 जानेवारीला सर्व संचालकांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली आहे. जिल्हा उपनिबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी ज्ञानेश्वर खाडे यांनी ही निवडणूक प्रक्रिया पार पडली.
बँकेचे विद्यमान अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार यांच्या नेतृत्वावर विश्वास टाकत 21 संचालक मंडळाने बिनविरोध निवडणूक पार पडली. त्यामुळे पुन्हा एकदा अध्यक्षपदाची माळ प्रंचित पोरेड्डीवार यांच्याच गळ्यात पडण्याची दाट शक्यता आहे. विभागीय सहनिबंधक हे अध्यक्ष व उपाध्यक्षांच्या निवडीसाठी अधिसूचना काढतील. त्यानंतर 15 दिवसाच्या आत ही निवडणूक प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.
हेही वाचा - नाशिकमधील सीएनजी, पीएनजी गॅस प्रकल्पाचा भुजबळांकडून आढावा