धुळे- भाजप-शिवसेना युतीच्या वेळी आम्ही शेतकऱ्यांच्या विषयावर अधिक लक्ष देण्याची अट घातली. मला जनतेत जाऊन काम करायला आवडते, म्हणून मी तुमचे आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे. मला नवमहाराष्ट्र घडवायचा आहे, असे प्रतिपादन युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले. जनआशीर्वाद दौऱ्याच्या निमित्ताने आदित्य ठाकरे हे धुळे दौऱ्यावर आले होते.
लोकसभा निवडणुकीच्या यशानंतर जनतेचे आभार मानण्यासाठी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघाले आहेत. या दौऱ्याची सुरुवात त्यांनी उत्तर महाराष्ट्रापासून केली आहे. यापार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे हे शुक्रवारी धुळे दौऱ्यावर आले होते. कृषी उत्पन्न बाजार समिती येथे आदित्य ठाकरे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला.
शिवसेना जनतेसाठी सदैव तत्पर असते, या यात्रेच्या माध्यमातून आदित्य ठाकरे हे तुमच्या आमच्यापर्यंत पोहचले आहेत, असे मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले. या यात्रेमुळे सर्वत्र आदित्य ठाकरेंचा जयजयकार होताना दिसतोय, हवा फक्त मोदींची नसते तर हवा आदित्य ठाकरेंची सुद्धा आहे हे यामुळे कळाले आहे. केंद्रात मोदी आणि महाराष्ट्रात आदित्य ठाकरे असे आमचे ठरले आहे, असे प्रतिपादन राऊत यांनी यावेळी केले.
आदित्य ठाकरे यांच्यासोबत संजय राऊत, धुळे जिल्हा संपर्क प्रमुख बबन थोरात, पालकमंत्री दादा भुसे, यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी,शिवसैनिक आणि शेतकरी उपस्थित होते.