धुळे - गोरक्षकांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटनांच्यावतीने शहरातून मूक मोर्चा काढण्यात आला. धुळे शहरात सुरू असलेले कत्तलखाने बंद करावे, कत्तलखाने चालवणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी या मोर्च्याच्या माध्यमातून करण्यात आली. यावेळी पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांना निवेदन देण्यात आले.
शहरातील वडजाई रोड भागात मंगळवारी रात्री सशस्त्र टोळक्याने गोरक्षक तरुणांवर हल्ला चढवल्याची खळबळजनक घटना घडली होती. या घटनेत विकास गोमसाळे आणि मयूर विभांडीक हे दोघे तरुण जबर जखमी झाले आहेत. जखमी तरुणांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या हल्ल्यात टोळक्याने रिक्षा क्रमांक एमएच १८, एन ७९५६ ची देखील तोडफोड केली. याप्रकरणी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोरक्षकांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटनांच्यावतीने धुळे शहरातील मनोहर चित्र मंदिराजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून मूक मोर्चा काढण्यात आला. या मोर्च्यात हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
शहराच्या प्रमुख मार्गावरून निघालेला हा मोर्चा पोलीस अधीक्षक कार्यालयात आल्यावर याठिकाणी मोर्च्याच्या शिष्टमंडळाच्यावतीने पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले. धुळे शहरात सुरू असलेले कत्तलखाने बंद करावे, कत्तलखाने चालवणाऱ्यांवर कारवाई करावी, तसेच ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत कत्तलखाने सुरू आहेत त्या पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकांवर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यानंतर लगेचच पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांनी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुबेर चौरे यांची तडकाफडकी बदली केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच आजवर ज्या कारवाया झाल्या त्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांनी केल्या आहेत. त्यामुळे भ्रष्ट पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांनी उचलला आहे. कुबेर चौरे यांच्या बदलीबाबत पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकलेला नाही.
यानंतर अवैधरित्या चालणाऱ्या कत्तलखान्यांवर पोलीस प्रशासन काय कारवाई करते हे बघणे महत्वाचे असणार आहे. अत्यंत संवेदनशील म्हणून समजल्या जाणाऱ्या धुळे शहरात विविध अवैध धंदे तसेच कत्तलखाने सर्रासपणे सुरू आहेत. याआधी धुळे शहराने २ दंगली अनुभवल्या आहेत. यामुळे धुळे शहराची प्रतिमा ही मलीन झाली आहे. यामुळे यावर कारवाई करण्यासोबत पोलीस प्रशासनाने भ्रष्ट पोलीस अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करून अवैधरित्या चालणारे धंदे आणि कत्तलखाने बंद करावे अन्यथा भविष्यात धुळे शहरात पुन्हा दंगल झाल्यास त्याला पोलीस प्रशासन जबाबदार असेल अशी चर्चा यानिमित्ताने सुरू झाली आहे.